सांगली : महापालिका क्षेत्रात गेल्या ३० ते ३५ वर्षे काम करणाऱ्या बदली कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त दिवस काम देण्याचा निर्णय उपायुक्त राहुल रोकडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
महापालिका कामगार सभेचे प्रतिनिधी व प्रशासन अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत अनेक प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बैठकीत वाहनचालकाचे प्रशिक्षण घेणाऱ्या बदली कर्मचाऱ्यांना चालकपदी नियुक्ती करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यामुळे बदली कर्मचाऱ्यांना महिन्यातील जास्तीत जास्त दिवस काम मिळणार आहे. बदली, मानधन, रोजंदारी कर्मचाऱ्यांना ज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, या कर्मचाऱ्यांना अपघात विमा योजना लागू करावी, त्यांना गणवेश व मासिक वेतनचिठ्ठी मिळावी, चार वर्षातील सुट्ट्यांचा पगार देणे या विषयावर सकारात्मक चर्चा झाली.
आरोग्य कर्मचाऱ्यांचे पंधरा दिवसातून वैद्यकीय तपासणीसाठी शिबिर घेण्याचा निर्णयही बैठकीत घेतला. या बैठकीला संघटनेचे उपाध्यक्ष अमित ठाकर, सचिव दिलीप शिंदे, सहसचिव विजय तांबडे, एकनाथ माळी यांनी भाग घेतला होता.