मिरजेत २०१९ च्या महापुराच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांबाबत महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. दोन वर्षांपूर्वी महापुराच्या वेळी महापालिका प्रशासनाकडून काही त्रुटी राहिल्या होत्या. आता महापालिका पावसाळ्यापूर्वी प्रशासन सज्ज आहे. पूर क्षेत्रात येणाऱ्या साडेचार हजार नागरिकांना स्थलांतरणाची नोटीस देऊन त्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात येईल. यासाठी मिरजेतील सहा शाळांच्या इमारतींत त्यांना आश्रय देण्यात येईल. मिरजेत यापूर्वी महापालिकेची एकच यांत्रिक बोट असल्याने अडचण येत होती. आता तीन बोटी उपलब्ध करण्यात आल्याने पूरस्थिती हाताळताना अडचण निर्माण होणार नाही. आरोग्य विभागाच्या निरीक्षकांना वाॅकीटॉकी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नगरसेवक व पूर क्षेत्रात काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वाॅकीटॉकी देण्यात येईल. यामुळे प्रशासनाला पूरस्थितीची पूर्ण माहिती कळेल. पाच जिल्ह्यांची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सांगलीत आहे. पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी वॉर रूम, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज सफाई, नालेसफाईची कामे पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांना सूचना देण्यात आल्या असून, महापालिकेची यंत्रणा पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज असल्याचा दावा महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला.
बैठकीस स्थायी सभापती पांडुरंग कोरे, उपायुक्त स्मृती पाटील, प्रभाग सभापती गायत्री कल्लोळी, सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, नगरसेवक संजय मेंढे, नगरसेविका संगीता हारगे, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, गजेंद्र कल्लोळी यांच्यासह अग्निशमन, आरोग्य व सर्व विभागाचे अधिकारी बैठकीस उपस्थित होते.