लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू करण्यास परवानगी असताना कापडपेठेतील गोखले वाॅच हे घडाळ्याचे दुकान गुरुवारी उघडले होते. महापालिका व पोलिसांच्या संयुक्त पथकाने दुकानदाराला दहा हजारांचा दंड केला, तसेच मास्क नसल्याबद्दल दोन व्यक्तींनाही दंड करण्यात आला.
आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त अशोक कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली. प्रशासनाने केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने दुपारी चार वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी दिली आहे. अत्यावश्यक आस्थापनांना 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याबाबत शासनाचे आदेश आहेत. कापडपेठेतील गोखले वॉच हे दुकान गुरुवारी उघडण्यात आले होते. ही बाब महापालिकेच्या पथकास निर्दशनास आली. आरोग्य व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने दुकानांची तपासणी केली. कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पथकाने दहा हजार रुपयांचा दंड केला, तर विनामास्क दोन व्यक्तींवर एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली. कारवाईत सहायक आयुक्त अशोक कुंभार, स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे, किशोर कांबळे, गणेश माळी सहभागी झाले होते.