सांगली : कोरोनामुळे महापालिकेची तिजोरी छोटी झाली असताना स्थायी सभापती पांडुरंग कोरे यांनी विकासाचे स्वप्न रंगवीत ७५४ कोटींचे अंदाजपत्रक महासभेकडे सादर केले. कोणतीही करवाढ न करता नव्या योजनांचा संकल्प सोडला आहे. महापुरुषांचे पुतळे, उद्याने, क्रीडांगण, स्वागत कमानी यासाठी अंदाजपत्रकात निधीची तरतूद करण्यात आली आहे.
चौकट
प्रतापसिंह उद्यान शिवसृष्टी
कधीकाळी आकर्षणाचे केंद्र असलेल्या प्रतापसिंह उद्यानाच्या विकासासाठी दरवर्षी अंदाजपत्रकात तरतूद केली जाते. यंदा सभापतींनी या उद्यानात शिवसृष्टी उभारण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली.
चौकट
महापुरुषांचे पुतळे
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासाठी प्रत्येकी २५ लाखांची तरतूद केली आहे, तसेच महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी २५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी ९५ लाखांची तरतूद केली आहे.
चौकट
सायन्स पार्क
महापालिका क्षेत्रात सायन्स पार्क विकसित करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यासाठी तीन शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी जागेचा शोध घेऊन त्याठिकाणी सायन्स पार्क उभारले जाणार आहे. त्यासाठी २५ लाखांचा निधी देण्यात आला आहे.
चौकट
कुपवाडवर मेहेरनजर
कुपवाड शहरातील दर्गा रस्त ट्रीमिक्स पद्धतीने करण्यासाठी १ कोटी ४२ लाख, मदनभाऊ मिनी क्रीडांगणासाठी २५ लाख, नवीन उद्यानासाठी व भाजीमंडईसाठी ५० लाखांची तरतूद केली आहे, तसेच यशवंतनगर येथील मदनभाऊ बालोद्यानाच्या सुशोभीकरणासाठी २५ लाखांचा निधी देण्यात आला आहे.
चौकट
स्वागत कमानी
महापालिका क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या चार प्रमुख रस्त्यांवर स्वागत कमानी उभारण्याचा संकल्प करण्यात आला. इस्लामपूर, कोल्हापूर, पंढरपूर व म्हैसाळ या चार रस्त्यांवरील कमानीसाठी २ कोटींची तरतूद केली आहे.
चौकट
मुख्य रस्त्याचा विकास
शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी कोल्हापूर रोड ते शाहू चौक शंभरफुटी रस्त्यासाठी २ कोटी ७५ लाख, मिरज इदगाह मैदान ते सेवासदन हाॅस्पिटल शंभर फुटी रस्त्यासाठी २ कोटी, बायपास ते माधवनगर जुना जकात नाका रस्ता १ कोटी, तर मिरज जुना कळंबी रोड ते पंढरपूर रोड यासाठी ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
चौकट
वंचित सदस्यांसाठी दीड कोटी
जिल्हा नियोजन समितीच्या सात कोटींच्या निधीतून अनेक नगरसेवकांना वगळण्यात आले होते. या सदस्यांनी त्याबद्दल नाराजीही व्यक्त केली होती. सभापती कोरे यांनी निधीपासून वंचित राहिलेल्या या ३० नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे १ कोटी ५५ लाख रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे.
अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये
१. सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणातील पाण्याच्या निचऱ्यासाठी ४५ लाख
२. महापालिका क्षेत्रात ई-टाॅयटेल बसविणे : २५ लाख
३. रमाई उद्यान विकास : ४० लाख
४. मिरज बालगंधर्व नाट्यगृहात आर्टगॅलरी : ३५ लाख
५. प्रबोधनकार ठाकरे चौक सुशोभीकरण : १० लाख
६. मिरजेत नवीन क्रीडांगण - १ कोटी
७. स्थायीच्या १६ सदस्यांना निधी : ४ कोटी