सांगली : सफाई कर्मचाऱ्यांच्या बहुतांश कामाकरिता तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता असल्याने नव्या आकृतिबंधामध्ये त्यांना बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ॲड. अमित शिंदे यांनी केली आहे.
याबाबत आयुक्त, कामगार अधिकाऱ्यांकडे हरकती दाखल करण्यात आल्या. शिंदे म्हणाले की, महापालिकेने नवा आकृतिबंध तयार केलेला आहे. त्यात शहराच्या गरजेनुसार नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. शहरांमध्ये आरोग्यविषयक सेवा हा नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आरोग्य विभागाकडे महापालिकेचे दवाखाने व दैनंदिन स्वच्छतेची जबाबदारी देण्यात आली आहे. गटारी तुंबणे, सांडपाण्याचा निचरा न होणे, साठलेले पाणी काढण्यासाठी व्यवस्था करणे अशी अनेक तांत्रिक कामे सफाई कर्मचारी करीत असतात. या सर्व कामांसाठी तांत्रिक ज्ञान असलेल्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीची आवश्यकता आहे. परंतु, आरोग्य विभागाचे प्रमुख अधिकारी हे वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तांत्रिक स्वरूपाची कामगिरी केल्याने प्रश्न तात्पुरते सुटतात, परंतु कायमस्वरूपी मार्गी लागत नाहीत.
त्यामुळे नव्या आकृतिबंधामध्ये आरोग्य विभागाकडील सफाई कर्मचारी वर्ग हा बांधकाम विभागाकडे जोडण्यात यावा. त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.