मिरज : मिरज-बेडग रस्त्यावरील परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोकादायक ठरणारा कत्तलखाना अखेर बंद करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, तीन वर्षांपासून मिरज पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून सुरु असलेल्या लढ्याला यामुळे यश आले आहे.
मिरज - बेडग रस्त्यावरील कत्तलखान्याचा विषय तीन वर्षांपासून मिरज पंचायत समितीच्या मासिक सभेत गाजत राहिला. कत्तलखान्याच्या दुर्गंधीने परिसरातील नागरिक नरकयातना भोगत आहेत. अनेक व्याधींनी ते त्रस्त आहेत. या मार्गावरुन येणाऱ्या लोकांनाही याचा त्रास होत होता. जनावरांच्या उघड्यावर टाकलेल्या अवयवांमुळे मोकाट श्वानांकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे कत्तलखाना परिसरात भीतीचे वातावरण होते. नागरिकांनी आंदोलन करूनही महापालिकेने कत्तलखाना बंद करण्याकडे दुर्लक्ष केले.
उपसभापती अनिल आमटवणे, किरण बंडगर यांच्यासह सदस्यांनी या कत्तलखान्याविरोधात पंचायत समिती सभेत सातत्याने आवाज उठवला. तत्कालीन जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांनी महापालिका प्रशासनाला उपाययोजनेसाठी बैठक घेण्याची सूचना केली होती. मात्र, महापालिका प्रशासनाने बैठक घेण्याचे टाळले. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकांकडे पाठ फिरवली.
गेल्या मासिक सभेत सभापती त्रिशला खवाटे, उपसभापती आमटवणे, किरण बंडगर यांच्यासह सदस्यांनी कत्तलखाना बंद पाडण्याचा इशारा दिला होता. तशी तयारीही करण्यात आली होती. तत्पूर्वी गुरूवारी होणाऱ्या मासिक सभेपूर्वी कत्तलखाना बंद ठेवण्यात आल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी दिल्याने संघर्ष टळला आहे. कत्तलखाना बंद केल्याने तीन वर्षांच्या लढ्याला यश आले आहे.
चौकट
...तर जनआंदोलन करू : आमटवणे
कत्तलखाना बंद ठेवण्यासाठी तीन वर्षे संघर्ष सुरु आहे. गुरूवारच्या मासिक सभेनंतर याचा उद्रेक होणार होता. परंतु, महापालिकेच्या निर्णयाने तो टळला आहे. जनतेच्या आरोग्याचा विचार करून कत्तलखाना भविष्यातही बंद ठेवावा. पुन्हा सुरु केल्यास तो बंद पाडू, असा इशारा मिरज पंचायत समितीचे उपसभापती अनिल आमटवणे यांनी दिला.