सोमनाथ डवरी-कसबे डिग्रज --कसबे डिग्रज (ता. मिरज) येथील शतकमहोत्सवी विकास सोसायटीची निवडणूक होणार असून, या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी हालचाली गतिमान झाल्याचे दिसत आहे. मिरज पश्चिम भागात विविध सोसायटी, ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे कसबे डिग्रज सोसायटी जिंकण्यासाठी गटातटात विभागलेली राष्ट्रवादी आणि कॉँग्रेस पक्षातील जयंत पाटील समर्थकांची राजारामबापू कारखान्यावर गुरुवारी बैठक घेऊन जयंतरावांनी कानपिचक्या दिल्या. कॉँग्रेस समर्थकांचीही गावात बैठक झाली.कसबे डिग्रज सोसायटी जिल्ह्यातील अग्रगण्य संस्था आहे. संस्थेने शंभर वर्षे पूर्ण केलेली आहेत. निवडणुकीसाठी २३०० सभासद मतदार आहेत. पैकी काही थकबाकीदारांना मतदान करता येणार नाही. गतवेळेची निवडणूक कॉँग्रेस-राष्ट्रवादी अशी थेट लढत झाली होती. कॉँग्रेसचे नेतृत्व माजी जि. प. सदस्य श्रीपाल चौगुले, तालुका कॉँग्रेस अध्यक्ष आनंदराव नलवडे यांनी केले होते, तर राष्ट्रवादीचे नेतृत्व माजी पंचायत समिती सदस्य अजयसिंह चव्हाण, मोहनराव देशमुख, अण्णा सायमोते, उद्योजक रामभाऊ मासाळ यांनी केले होते. अत्यंत नियोजनबद्ध यंत्रणा राबवून ही निवडणूक राष्ट्रवादीने जिंकली होती. गुरुवारी सोसायटी निवडणुकीबाबत चर्चा करणे गटबाजी संपविण्यासाठी राजारामबापू कारखान्यावर जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सर्व गटांसह कॉँग्रेसमधील समर्थकांनाही एकत्र आणले होते. यावेळी कोणत्याही परिस्थितीत सोसायटी जिंकली पाहिजे, असे जयंतरावांनी सांगितले. यावेळी मोहनराव देशमुख, अजयसिंह चव्हाण, रामचंद्र मासाळ गटाचे प्रतिनिधी कुमार लोंढे, धनंजय फराटे यांच्यासह कॉँग्रेसचे आनंदराव नलवडे, सदाशिव कदम आदी उपस्थित होते. गद्दारी कोणी केली, याबाबत मोठा खल झाला. याचवेळी मदन पाटील समर्थक प्रा. शिकंदर जमादार यांनाही दूरध्वनीवरून संपर्क साधून साथ देण्याचे आवाहन जयंतराव पाटील यांनी केले. पण त्यांनी ‘मला सुट्टा ठेवा, मी विधानसभेला तुमच्यासोबत आहे’, अशी भूमिका घेतली.दरम्यान, गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीपाल चौगुले यांनी या बैठकीची सविस्तर माहिती घेत आपल्या गटाच्या दिवसभर बैठका घेतल्या. पॅनेल तयार आहे, निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन करून वसंतदादा कारखान्यावर मार्गक्रमण केले.एकंदरीत राष्ट्रवादीतील गट-तट जयंत पाटील समर्थक बरोबर एकत्र येणार का?, असा प्रश्न आहे किंवा राष्ट्रवादीच्या गटबाजीचा फायदा घेत कॉँग्रेस एकत्र पॅनेल करणार का, याबाबत उत्सुकता आहे. संपूर्ण मिरज पश्चिम भागातील पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी निवडणुकीपूर्वीच जयंत पाटील यांनी लक्ष घातल्याचे दिसत आहे. यामुळे आता निवडणूक चुरशीची होणार. राष्ट्रवादी तहात हरलीकसबेडिजग्र सोसायटीत पहिल्या एक वर्षातच राष्ट्रवादीत पुन्हा गटबाजी उफाळून आली. सध्या सोसायटीवर कॉँग्रेस समर्थक गटाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे युद्धात जिंकलेली राष्ट्रवादी गटबाजीमुळे तहात हरली, असे झाले आहे.
कसबे डिग्रज सोसायटीसाठी हालचाली गतिमान
By admin | Updated: September 30, 2015 00:03 IST