वारणावती : शिराळा तालुक्यातील मणदूर-धनगरवाडा येथील जमिनीच्या फाळणीमध्ये जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे. त्यासाठी मणदूर ग्रामपंचायतीच्या वतीने येत्या ५ एप्रिल रोजी शिराळा तहसीलदार कार्यालय व चांदोली वन्यजीव कार्यालय येथे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामध्ये ठोस निर्णय झाला नाही, तर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे सरपंच वसंत पाटील यानी दिला आहे.
पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या ८० वर्षांपासून वनविभाग आणि मणदूर धनगरवाडा, विनोबाग्राम येथील जमिनीसंदर्भात वाद सुरू आहे. भूमिअभिलेख कार्यालय जाणीवपूर्वक दिरंगाई करीत आहे. तर वन्यजीव कार्यालयही गैरहजर असते. त्यामुळे तेथील शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा झाला आहे, पण आणेवारी झालेली नाही. त्यासाठी तहसीलदार कार्यालय व चांदोली वन्यजीव कार्यालय येथे ५ एप्रिल रोजी आंदोलन करणार आहे, असा इशाराही दिला आहे.
निवेदनाच्या प्रती तहसीलदार, विभागीय वन अधिकारी, कोकरूड पोलीस ठाणे, वन्यजीव कार्यालय, आ. मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, गोपीचंद पडळकर यांना दिल्या आहेत.