सांगली : शहरातील एका फायनान्स कंपनीने कर्जदारांकडे अनावश्यक कागदपत्रांची मागणी करीत त्रास देण्यास सुरुवात केली आहे. कर्जदाराच्या नातेवाइकांनाही मारहाण करण्यात आली. या प्रकाराबद्दल पोलीस उपअधीक्षक अजित टिके यांच्याकडे तक्रार केली आहे. ही अनावश्यक कागदपत्रे कंपन्यांकडून कशासाठी घेतली जात आहेत, याची पोलिसांनी चौकशी करावी. येत्या आठ दिवसांत चौकशी न झाल्यास कंपनी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ऋषीकेश पाटील यांनी रविवारी पत्रकार बैठकीत दिला.
पाटील म्हणाले की, शहरातील किसनलाल खत्री यांनी एका फायनान्स कंपनीकडून गृह कर्ज घेतले होते. गेल्या चार वर्षांपासून ते वेळेवर कर्जाचे हप्ते भरत आहेत. काही दिवसांपासून कंपनीच्या प्रतिनिधींनी खत्री यांच्याकडे आधार कार्ड, पॅनकार्ड, शाॅप ॲक्ट परवाना, उद्योग परवाना या कागदपत्रांसाठी तगादा लावला. खत्री यांनी ही कागदपत्रे कशासाठी हवीत, अशी विचारणा केली; पण त्याची समर्पक उत्तर न देता कंपनीच्या तीन कर्मचाऱ्यांनी त्यांना व त्याचा मुलगा अक्षय याला मारहाण केली. याबाबत पोलिसांत तक्रार दाखल आहे. पोलिसांनी किरकोळ कारवाई करीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सोडले.
याबाबत उपअधीक्षक टिके यांची भेट घेतली. गृहकर्ज घेतले असताना व्यवसायाशी संबंधित कागदपत्रांची कशासाठी मागणी केली जाते ेयाची चौकशी करण्याची विनंती केली आहे. फायनान्स कंपनीकडून होणाऱ्या गैरप्रकाराला आळा घालण्याची गरज आहे. येत्या आठ दिवसांत चौकशी न झाल्यास कंपनी कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही पाटील यांनी दिला.