लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महाविद्यालये सुरू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने सांगलीत निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य शासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
सांगलीत कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. ‘शिक्षणमंत्री एक काम करो, खुर्ची छोडो आराम करो’, ‘शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी परिषदेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण राज्यात नाही तर देशामध्ये कोरोनामुळे मार्च २०२०पासून सर्व महाविद्यालये बंद आहेत; पण आता परिस्थिती पूर्ववत होत आहे. महाविद्यालय बंद होऊन दहा महिने उलटून गेली, तरीही महाविद्यालये सुरू झालेली नाहीत. सर्व महाविद्यालयीन विद्यार्थी घरात बसून आहेत. हे सरकार त्यांच्या भावनांशी खेळत आहे. खऱ्या अर्थाने विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहे.
आजची परिस्थिती पाहता कोरोनाचा प्रादुर्भाव हा खूप कमी झाला आहे. राज्य सरकारने बिअर-बार, हॉटेल, मंदिरे, व्यायामशाळा हे सर्व एकीकडे सुरू केले आहे, मग महाविद्यालयेच बंद का? महाविद्यालये तातडीने सुरू करावीत.
येत्या काही दिवसांत जर महाविद्यालय चालू झाले नाहीत तर शिक्षणमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असे मत राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य प्रतीक पाटील यांनी मांडले. महाविद्यालय बंद असल्यामुळे जे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान झाले आहे, याला सरकार जबाबदार आहे, असे मत माधुरी लड्डा यांनी व्यक्त केले. मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने महाविद्यालयाच्या प्राचार्यांना देण्यात आले.