सांगली : शहरातील विविध भागांतून मोटार सायकली चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. शाहीद हुसेन आसंगी (वय २१, रा. टिंबर एरिया, सांगली) आणि हेमंत जगन्नाथ आवळे (२१, रा. अभिनंदन कॉलनी, संजयनगर, सांगली), अशी संशयितांची नावे असून, त्यांच्याकहून ८० हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात वाढत असलेल्या मोटारसायकल चाेरीच्या गुन्ह्याचा तपास करून आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी खास पथक तयार केले. रविवारी हे पथक गस्तीवर असताना, शहरातील शिंदे मळा परिसरातील बिरनाळे हायस्कूलजवळ संशयित शाहीद व हेमंत हे मोटारसायकल विक्रीसाठी थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने त्यांना ताब्यात घेत चौकशी केली. यात त्यांनी सहा महिन्यांपूर्वी आम्ही दोघे व सार्थक सुनील सुतार (रा. रामरहीम कॉलनी), असे तिघांनी मिळून संजयनगर येथून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यासह समाधान कॉलनी, सिटी हायस्कूल आदी भागांतूनही दुचाकी चोरल्याची माहिती त्यांनी दिली. चोरलेल्या दुचाकी त्यांनी अहिल्यादेवी होळकर चौकातील एका पानपट्टीच्या मागे लावून ठेवल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चार मोटारसायकली जप्त केल्या.
निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, संदीप पाटील, सुधीर गोरे, अनिल कोळेकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.