शैला मिरजे यांनी शेख व बागवान या दोघींकडून जुलै २०१७ मध्ये ३० टक्के व्याजाने २० हजार रुपये कर्ज घेतले. त्या मोबदल्यात महिन्याला ६ हजार रुपये प्रमाणे ३६ हजार रुपये व्याज व दि. १४ जुलै २०१९ पर्यंत १ लाख रुपये व्याज व मुद्दल १ लाख रुपये असे एकूण दोन लाख ३६ हजार रुपये देण्यासाठी दोघींनी तगादा लावला होता. रक्कम वसुलीसाठी शेख व बागवान या दोघींनी मिरजे यांच्याकडून करारपत्र करून घेतले. सावकारी कर्ज फेडण्यासाठी बचत गटातून कर्ज काढण्यासाठी शेख व बागवान या दोघींनी मिरजे यांच्याकडून कोरा मुद्रांक, दोन कोरे धनादेश, पॅनकार्ड व आधारकार्डाची झेरॉक्स घेतली.
यास्मीन बागवान हिच्याकडून हातउसने घेतलेल्या १० हजार रुपये कर्ज भागविण्यासाठी कर्ज मंजूर न झाल्याने यास्मीन बागवान हिने मिरजे यांचे सोन्याचे मंगळसूत्र एका फायनान्स कंपनीकडे तारण ठेवून त्यावर पाच हजार रुपये घेतले. मात्र, बागवान हिने मिरजे यांना कर्जासाठी घेतलेली वरील कागदपत्रे परत केली नाहीत. करारपत्राशिवाय कर्ज आणि व्याज असे ४ लाख ५० हजार रुपये द्या किंवा मालमत्ता खरेदी करून द्या, नाहीतर तुमच्या मुलांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवीन अशी धमकी दिल्याचे शैला मिरजे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याप्रकरणी शेख व बागवान या दोन महिलांवर मिरज शहर पोलिसांत सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.