गतवर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर २२ मार्चपासून मिरजेतून धावणाऱ्या सुमारे ६५ पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वे बंद करण्यात आल्या. सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने पुन्हा एक्स्प्रेस सुरू करण्यात आल्या. या विशेष एक्स्प्रेसमुळे प्रवाशांची सोय झाली. मात्र, गेले वर्षभर मिरजेतून जाणाऱ्या कोल्हापूर, बेळगाव, सातारा, पुणे, पंढरपूर, कुर्डूवाडी पॅसेंजर बंद असल्याने दरारोज ये-जा करणारे नोकरदार, व्यावसायिक व विद्यार्थांची गैरसोय होत आहे. अनलाॅक काळात कोयना, महालक्ष्मी, महाराष्ट्र, हुबळी-कुर्ला, राणी चेन्नम्मा, तिरुपती, यशवंतपूर-निजामुद्दीन, वास्को-निजामुद्दीन, कोल्हापूर-नागपूर यासह इतर साप्ताहिक एक्स्प्रेसही सुरू झाल्या आहेत. मात्र, मिरज-पंढरपूर मार्गावरील रेल्वे गाड्यांसह पॅसेंजर रेल्वे सुरू होण्याबाबत प्रवाशांना आता आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
मार्चपासून पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याची रेल्वे प्रशासनाने तयारी केली होती. सांगली-मिरजेसह विविध स्थानकात थांबून असलेल्या रेल्वेगाड्या विविध स्थानकाकडे रवाना करण्यात आल्या. मात्र, मार्चपासून कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढली असून राज्यात काही जिल्ह्यांत निर्बंध लागू झाले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनाचा लाल सिग्नल असल्याने परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत पॅसेंजर रेल्वे सुरू होणार नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. इंधन दरवाढ व पॅसेंजर बंद असल्याने दररोज ये-जा करणाऱ्या व्यापारी व नोकरदारांना भुर्दंड सुरू आहे. आता सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील प्रवाशांना पॅसेंजर रेल्वेसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
चाैकट
प्लॅटफॉर्म तिकीट ५० रूपये
रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या नातेवाइकांनी गर्दी करू नये यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट गेल्या मार्चपासून दहा रुपयावरून ५० रुपये करण्यात आले आहे. सर्व प्रमुख रेल्वे स्थानकासाठी प्लॅटफॉर्म तिकिटाचे पाचपट दर व प्लॅटफॉर्म तिकिटाशिवाय रेल्वे स्थानकात येणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असल्याने रेल्वे स्थानकात वर्दळ कमी झाली आहे.
चाैकट
आठवड्याभरापासून तपासणी बंद
अनलाॅक काळात एक्स्प्रेस सुरू केल्यानंतर प्रवाशांची स्थानकात तपासणी, कोविड तपासणी प्रमाणपत्र, आरक्षित तिकीटधारकांनाच रेल्वेत प्रवेश, प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना मज्जाव यासह कोविड प्रोटोकाॅलची सक्ती करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून रेल्वे स्थानकात प्रवाशांची तपासणी बंद झाली आहे. प्रतीक्षायादीतील प्रवासीही प्रवास करीत असल्याचे चित्र आहे.