सांगलीत जिल्हा परिषदेत आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह सभापती प्रमोद शेंडगे, जगन्नाथ माळी, आशा पाटील, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मॉडेल स्कूलचा उपक्रम राज्यात आदर्श ठरेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले. जिल्हा परिषदेतील शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यावेळी उपस्थित होत्या.
डुडी म्हणाले की, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात १४१ शाळांमध्ये मॉडेल स्कूल उपक्रम राबविण्यात येत आहे. लोकांनीही त्यामध्ये चांगला सहभाग दिला आहे. हा उपक्रम आदर्श ठरणार आहे. अध्यक्षा कोरे म्हणाल्या की, कोरोनाकाळात शिक्षकांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही. ऑनलाईनद्वारे शिक्षण अखंडित ठेवले. त्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत झाली.
यावेळी शिक्षण सभापती आशा पाटील, समाजकल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनीही मनोगत व्यक्त केले. कोरे यांच्या हस्ते ११ शिक्षकांना आदर्श पुरस्कार व आठ शिक्षकांना गुणवंत पुरस्कार देण्यात आले. कार्यक्रमाला बांधकाम सभापती जगन्नाथ माळी, सदस्या ॲड. शांता कनुंजे, स्नेहलता जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, शिक्षणाधिकारी विष्णू कांबळे, आदी उपस्थित होते. उपशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांनी आभार मानले.