फोटो ०३ शीतल ०२
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरज येथील ‘मियावाकी वनराई’ प्रकल्पाचा पहिला वाढदिवस आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. महापालिकेतर्फे हा कृत्रिम जंगल निर्मितीचा प्रकल्प राबविण्यात आला होता.
या प्रकल्पाला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. गतवर्षी जेमतेम दीड ते दोन फूट उंचीची लावलेली झाडे केवळ वर्षभरात सरासरी १२ ते १५ फूट उंचीची झाली आहेत. या प्रकल्पाच्या ठिकाणी घनदाट जंगल तयार झाले आहे. यात सुमारे ५८ स्थानिक व देशी जातींची झाडे आहेत. झाडांच्या दाटीमुळे या वनराईत अनेक जातींची फुलपाखरे, पक्षी, छोटे सस्तन प्राणी व मधमाशा येऊ लागल्या आहेत. त्यामुळे जैवविविधतेने समृद्ध असे एक छोटे जंगल इथे तयार होत आहे. या प्रकल्पाचे तांत्रिक नियोजन व अंमलबजावणी ‘नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी’ या संस्थेने केली होती. आरके'ज ग्रुप ऑफ सर्व्हिसेसचे रवींद्र केंपवाडे हे या प्रकल्पाचे कंत्राटदार होते.
या प्रकल्पाच्या वर्षपूर्तीनिमित्त आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच नेवार म्हणजेच समुद्रफळ या दुर्मीळ देशी झाडाचे रोप लावण्यात आले. यावेळी माजी महापौर संगीता खोत, विठ्ठल खोत उपस्थित होते.
चौकट
ठिकठिकाणी मियावाकी जंगल उभारू : कापडणीस
मियावाकी पद्धतीने तयार केलेल्या जंगलाचे पारंपरिक वृक्षारोपणाच्या तुलनेत अनेक फायदे आहेत. हे जंगल नैसर्गिक जंगलापेक्षा १० पट अधिक वेगाने वाढते. या जंगलाची हवेतील कार्बनडायऑक्साईड शोषून घेण्याची क्षमता ३० टक्के अधिक असते. या जंगलाच्या जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याचे खूप कमी बाष्पीभवन होते. त्यामुळे भूजल पुनर्भरण होण्यास मदत होते. त्यामुळे असे जास्तीत जास्त प्रकल्प महापालिका क्षेत्रात राबविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आयुक्त कापडणीस यांनी सांगितले.
फोटो ओळी - मिरजेत महापालिकेच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मियावाकी जंगलाचा पहिला वाढदिवस आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला.