मिरज : मिरजेत माणिकनगर रेल्वे कर्मचारी वसाहतीत असलेल्या इंधन डेपोसमोर उभे करण्यात येणारे इंधन टँकर हटविण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी शनिवारी इंधन टँकर रोखले. या इंधन टँकरमुळे वाहतूक कोंडी व अपघात होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. माणिकनगर येथे रेल्वेला इंधन पुरवठा करण्यासाठी इंधन डेपो आहे. या डेपोसाठी दररोज ट्रक टँकरमधून डिझेल आणण्यात येते. इंधन घेऊन येणाऱ्या टँकरच्या माणिकनगर वसाहतीत रस्त्यावर रांगा लागतात. टँकरमुळे वाहतुकीस अडथळा होऊन यापूर्वी अपघात झाले आहेत. तसेच टँकरचालक येथून येणाऱ्या-जाणाऱ्या महिला व मुलींची छेडछाड करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. यामुळे रेल्वे कर्मचारी संघटनेचे मुसा जमादार, नीतेश कांबळे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी इंधन टँकर रोखल्याने रेल्वेचा इंधन पुरवठा थांबला होता. रेल्वे अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून, इंधन घेऊन येणारे टँकर मर्यादित प्रमाणात रस्त्यावर थांबविण्याचे व टँकरमुळे वाहतुकीची कोंडी होणार नाही याची दक्षता घेण्याचे आश्वासन दिले. (वार्ताहर)
मिरजेत रेल्वे कर्मचाऱ्यांनी इंधनाचे टँकर रोखले
By admin | Updated: June 12, 2016 01:10 IST