मिरज : दूषित पाण्याबाबतच्या उपाययोजना लाल फितीत अडकल्याने मिरजेत पुन्हा दूषित पाणी पुरवठ्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. ब्राह्मणपुरी परिसरात १५ जणांना अतिसाराची लागण झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मिरजेत ब्राह्मणपुरी, पाटील हौद परिसरात दूषित पाण्याच्या तक्रारी आहेत. गॅस्ट्रोसदृश आजाराची लागण झाल्याने या परिसरातील अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परिसरात सुमारे १५ जणांना अतिसाराची लागण झाल्याची तक्रार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या परिसरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. महापालिकेच्या वैद्यकीय पथकाकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. तीन महिन्यांपूर्वी शहरात दूषित पाण्यामुळे १४ जणांचे बळी गेल्यानंतर ब्राह्मणपुरी, उदगाव वेस, गुरुवार पेठ, मुजावर गल्लीसह दाट लोकवस्ती असलेल्या बारा ठिकाणी जुन्या जीर्ण जलवाहिन्या बदलण्याचा प्रस्ताव पाणी पुरवठा विभागाने दिला आहे. मात्र गॅस्ट्रो साथीची तीव्रता कमी झाल्यानंतर जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे काम लाल फितीच्या कारभारात अडकले आहे. दूषित पाण्याच्या तक्रारी पुन्हा सुरू झाल्यानंतर जुन्या जलवाहिन्या बदलण्याच्या प्रस्तावाची शोधाशोध सुरू आहे. (प्रतिनिधी)
मिरजेत पुन्हा दूषित पाणी पुरवठा सुरू
By admin | Updated: February 19, 2015 23:42 IST