मिरज : मिरजेत कॉँग्रेसचा विधानसभेचा उमेदवार आताच जाहीर करावा, यासाठी ग्रामीण भागातील कॉँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरू केलेल्या मोहिमेस शहरातील कॉँग्रेस नेत्यांनी थंडा प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवड रखडली आहे.लोकसभा निवडणुकीत मिरज विधानसभा मतदार संघात कॉँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला असल्याने ही पिछाडी भरून काढण्यासाठी दोन महिने अगोदरच कॉँग्रेसचा उमेदवार निश्चित करावा, अशी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मागणी आहे. विधानसभेसाठी मिरजेत कॉँग्रेसच्या इच्छुकांची संख्या जास्त आहे. यासाठी ग्रामीण भागातील कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन मिरजेचा विधानसभा उमेदवार निश्चितीसाठी मोहीम सुरू केली आहे. कॉँग्रेस पक्षाच्या परंपरेप्रमाणे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेपर्यंत उमेदवार जाहीर होतो. पंचायत समिती सभापती सुभाष पाटील, माजी सभापती अनिल आमटवणे, खंडेराव जगताप, सोनीचे सरपंच दिनकर पाटील, सलगरेचे तानाजी पाटील, आर. आर. पाटील आदी कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मतदार संघातील विविध गावात कॉँग्रेस कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. ४७ गावांतील कॉँग्रेस प्रतिनिधी निवडून उमेदवार निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. शहरातील कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांना भेटून उमेदवार निवडीसाठी त्यांची मते अजमावण्यात आली. मात्र शहरातील नेते, माजी महापौर किशोर जामदार, सुरेश आवटी, इद्रिस नायकवडी यांनी, पक्ष निवड करेल त्या उमेदवाराचे काम करू, अशी भूमिका घेतली आहे. किशोर जामदार यांनी, शहरातील एका नगरसेवकासाठी आग्रह धरला आहे. त्यांनी हा नगरसेवक विधानसभेचे उमेदवार असल्याचे ग्रामीण कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाला सूचित केले. शहरातील नेते वेगवेगळी भूमिका घेत असल्याने कॉँग्रेस उमेदवार निवड रखडली आहे. ग्रामीण भागातील कॉँग्रेस पदाधिकारी उमेदवाराची निवड करून त्याच्या प्रचाराची आतापासूनच सुरुवात करण्याच्या भूमिकेत आहेत. मात्र ग्रामीण व शहरी कॉँग्रेस नेत्यांची मते वेगवेगळी असल्याने उमेदवार कोण, याबाबत कॉँग्रेस कार्यकर्त्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. (वार्ताहर)
मिरजेत कॉँग्रेस उमेदवार निवड रखडली
By admin | Updated: July 28, 2014 23:23 IST