मिरजेतील महात्मा फुले उद्यानाची व तेथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याची दुरवस्था झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेतील महात्मा फुले उद्यानाच्या दुरवस्थेविरोधात पॅंथर सेना व रिपब्लिकन स्टुडंट युनियनने आंदोलनाचा इशारा दिला आहे. महात्मा फुले यांच्या नावे असलेल्या उद्यानाची विटंबना होत असल्याबद्दल महापालिकेचा निषेध केला आहे.
सांगली-मिरज रस्त्यावर महसूल भवनलगत महापालिकेचे महात्मा फुले उद्यान आहे. त्याच्या देखभालीकडे महापालिकेने गेल्या काही वर्षांत दुर्लक्ष केले आहे. उद्यानात झुडपे उगवली आहेत. शेजारच्या रहिवासी वसाहतीतील सांडपाणी उद्यानात शिरते. नैसर्गिक नाल्यांवर बांधकामे केल्याने पावसाळ्यात नाल्याचे पाणी थेट उद्यानात शिरते व महिनोन्महिने ते साचून राहते. उद्यानातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याचीही निगा राखण्यात आलेली नाही.
शहरभरातील कचरा व गटारींच्या खोदकामातील दगडमाती येथे आणून टाकली जाते. या भागात मोठ्या संख्येने रुग्णालये आहेत. तेथे येणारे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी हे उद्यान म्हणजे चांगले विश्रांतीचे स्थळ ठरू शकते; पण उद्यानाकडे महापालिकेचे लक्ष नसल्याने ते निरुपयोगी ठरले आहे. या दुरवस्थेचा पंचनामा ऑल इंडिया पॅथर सेना, रिपब्लिकन स्टुडंटस युनियनच्या कार्यकर्त्यांनी केला. महासचिव अमोल वेटम, जिल्हाध्यक्ष स्वप्निल खांडेकर यांनी महापालिकेचा निषेध केला. ११ एप्रिल या फुले यांच्या जयंतीपर्यंत दुरवस्था दूर केली नाही तर आंदोलनाचा इशारा दिला.