मिरज : मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिव्याख्याता डाॅ. ग्यानबा चोखोबा साेमवंशी (वय ६२, रा. मूळ अमरावती, सध्या रा. कर्मवीर चाैक, मिरज) यांनी आजाराला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. साेमवारी दुपारी ही घटना उघडकीस आली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कान, नाक व घसा विभागातील अधिव्याख्याता पदावर कार्यरत असलेले डाॅ. ग्यानबा साेमवंशी कर्मवीर चाैकात युनिक प्लाझा या इमारतीत भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटेच राहात होते. मूळचे अमरावती येथील डाॅ. सोमवंशी यांची चार वर्षांपूर्वी मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बदली झाली होती. त्यांची पत्नी व मुलगीही डाॅक्टर आहेत. सोमवारी दुपारी चार वाजता ते फोन उचलत नसल्याने पत्नीने शेजाऱ्यांना कळविले. शेजाऱ्यांनी डॉ. साेमवंशी यांच्या फ्लॅटमध्ये जाऊन पाहिले असता डाॅ. सोमवंशी यांनी बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावून घेतल्याचे निदर्शनास आले.
बेडवर त्यांनी लिहून ठेवलेली चिठ्ठी सापडली आहे. आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे त्यांनी चिठ्ठीत लिहिले होते. याबाबत शहर पोलिसांत नोंद असून डाॅक्टरांच्या आत्महत्येमुळे वैद्यकीय महाविद्यालयात खळबळ उडाली होती.