मिरज : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी प्रशासनाचे निर्बंध न जुमानता मिरजेत रस्त्यावर बाजार सुरूच आहे. या बाजारात होणाऱ्या गर्दीला रोखणे प्रशासनालाही कठीण झाले आहे. प्रशासनाने लागू केलेल्या निर्बंधांचे उल्लंघन सुरूच असल्याने कोरोनाचा धोका कायम आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरात विविध भागांतील आठवडाबाजार बंद करण्यात आले आहेत. मात्र, लक्ष्मी मार्केट परिसरात प्रशासनाचे निर्बंध झुगारत भाजीविक्रेते रस्त्यावर आहेत. महापालिका व पोलिसांकडून याबाबत दुर्लक्ष होत आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडाची कारवाई करणारे महापालिका व पोलीस कर्मचारी रस्त्यावरील बाजारावर कारवाई करीत नसल्याने बाजारात विक्रेते व ग्राहक गर्दी करीत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी लसीकरण मोहीम वेगात सुरू आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने पुन्हा लागू केलेल्या निर्बंधांची अंमलबजावणी आवश्यक आहे. मात्र, महापालिका व पोलीस परस्परांवर जबाबदारी ढकलत आहेत. सत्ताधारी नगरसेवकांच्या हस्तक्षेपामुळे रस्त्यावरील हातगाड्या, विक्रेत्यांबाबत गांधारीची भूमिका असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
व्यावसायिक, उद्योजक, दुकानदार, खासगी संस्था, शिक्षण संस्था, रिक्षाचालक, मंगल कार्यालये, हॉटेल्स, मॉल्स शासनाचे निर्बंध पाळून आपला व्यवसाय करत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील किसान चौक, टाउन हॉल, लक्ष्मी मार्केट इमारतीभोवती परिसर, हिंदमाता चौक, लोणी बाजार रस्ता, दत्त चौक, बालगंधर्व नाट्यगृह रस्ता व गाडवे चौक या परिसरात मात्र रस्त्यावर बाजार सुरूच आहे. या परिसरात खाद्यपदार्थ व अन्य वस्तू विक्रीच्या हातगाड्या, भाजी व फळविक्रेते, सरबत व कोल्ड्रिंक्स विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. बाजारात मास्कचा वापरही अभावानेच आहे. रस्त्यावर बाजार बसू देण्यास तसेच हातगाड्या लावू देण्यास न्यायालयाच्या मनाई आदेशाचे फलकही येथे लावले आहेत. तरीही, प्रशासनाचे आदेश धाब्यावर बसवून रस्त्यावर बाजारात गर्दी कायम आहे.
महापालिका अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करण्याचा प्रयत्न केल्यास नगरसेवक आक्रमक पवित्रा घेत असल्याने कारवाई करणे अडचणीचे ठरत आहे.