कोरोनामुळे गतवर्षी मार्चपासून रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत. अनलॉक काळात टप्प्याटप्प्याने एक्स्प्रेस रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. मात्र, अद्याप पॅसेंजर रेल्वे सुरू झालेल्या नाहीत. परिस्थिती सुरळीत होत असल्याने मार्चपासून पॅसेजर रेल्वे सुरू करण्याची रेल्वे प्रशासनाने तयारी केली होती. मात्र, फेब्रुवारीअखेरपासून पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पॅसेजर रेल्वे सुरू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मिरजेतून कोल्हापूर, बेळगाव, पुणे व पंढरपूर रेल्वे मार्गावर पॅसेंजर गाड्या बंदच आहेत. गेल्या दिवसांपासून मागणी होत आहे. कर्नाटकात कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात असल्याने रेल्वेने बेळगाव- मिरज मार्गावर पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कर्नाटक प्रशासनाने महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले असल्याने दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाने बेळगावातून तीन पॅसेंजर गाड्या मिरजेजवळ कर्नाटक हद्दीत शेडबाळ स्थानकापर्यंतच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
बेळगाव-शेडबाळ-बेळगाव ही पॅसेंजर दि. १० एप्रिलपासून सुरू होत असून ती बेळगाव येथून सकाळी ८ वाजता निघून सकाळी ११.१५ वाजता शेडबाळ येथे येईल. शेडबाळ येथून दुपारी १२ वाजता सुटून बेळगाव येथे दुपारी ३.१५ वाजता पोहोचणार आहे. हुबळी-शेडबाळ-हुबळी पॅसेंजर दि. १२ एप्रिलपासून सुरू होणार आहे. ही गाडी सकाळी ११ वाजता हुबळी येथून सुटेल. सायंकाळी ५ वाजता शेडबाळ येथे पोहोचेल. शेडबाळ येथून रात्री ७.३० वाजता सुटेल व हुबळी येथे मध्यरात्री २ वाजता पोहोचेल.
बेळगाव-शेडबाळ-बेळगाव पॅसेजर दि. १२ एप्रिलपासून सुरू होणार असून बेळगाव येथून पहाटे ४ वाजता सुटणारी ही गाडी शेडबाळ येथे सकाळी ६.३५ वाजता पोहोचणार आहे. शेडबाळ येथून सायंकाळी ५.३० वाजता सुटून रात्री ८.४५ वाजता बेळगाव येथे पोहोचेल.
पॅसेजर रेल्वे मिरजेऐवजी शेडबाळपर्यंतच ये-जा करणार असल्याने प्रवाशांना मिरजेपासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेडबाळ येथे ये-जा करावी लागणार आहे. मिरजेतून बेळगावला जाणाऱ्या व बेळगावातून मिरजेला येणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. कर्नाटक हद्दीतपर्यंच पॅसेजर रेल्वे सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे.