मिरज : मिरजेत भाजपमधील गटबाजीतून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमोरच आमदार व भाजप पदाधिकाऱ्यांत जोरदार वादावादी झाली. आ. खाडे यांनी पक्षाविरोधात काम केल्याचा आरोप केल्याने आमदार व पदाधिकाऱ्यांची जुगलबंदी झाली. शुक्रवारी रात्री रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर हा प्रकार सुरू असताना मंत्री तावडे महालक्ष्मी एक्स्प्रेसने मुंबईला निघून गेले. मिरजेत खासगी दौऱ्यावर मंत्री तावडे आले असताना, त्यांना भेटण्यासाठी रेल्वे स्थानकात आमदारविरोधी गटाचे पदाधिकारी रेल्वे स्थानकात आले होते. आमदारांनी या पदाधिकाऱ्याने पक्षाविरोधात काम केल्याची तक्रार मंत्री तावडे यांच्याकडे केल्यानंतर, संबंधित पदाधिकाऱ्याने, आपण इतरांपेक्षा ज्येष्ठ कार्यकर्ता असल्याचे सांगितल्याने जोरदार वादावादी झाली. मंत्री तावडे या वादात हस्तक्षेप न करता महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून निघून गेले. मंत्री गेल्यानंतरही संबंधित पदाधिकाऱ्याला रेल्वे स्थानकात कोणी आणले, यावरून अन्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांत वाद झाला. मिरजेत भाजपमधील गटबाजीतून परस्परांवर कुरघोड्या व परस्परांच्या कार्यक्रमाला मंत्री येऊ नयेत यासाठी अडथळे आणण्याचे प्रकार सुरू आहेत. याची कार्यकर्त्यांत चर्चा सुरू होती. (वार्ताहर)
मिरजेत आमदार, पदाधिकाऱ्यांत वाद
By admin | Updated: April 26, 2015 01:07 IST