मिरज : मिरजेत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो व कॉलऱ्याची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दीडशेवर पोहोचली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा कोलमडली असून उलट्या व जुलाबाच्या रूग्णांची संख्या वाढत आहे. मिरजेतील विविध रुग्णालयांत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेला आठवडाभर मिरजेतील विविध भागात उलट्या व जुलाबाने नागरिक हैराण आहेत. दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात दूषित पाण्यामुळे साथीच्या आजाराची मोठ्याप्रमाणात लागण झाली आहे. वेताळनगर येथील अस्लम नदाफ या वृध्दाचा काल, गुरूवारी गॅस्ट्रोसदृश आजाराने मृत्यू झाला. आजही मोठ्या संख्येने रूग्ण उपचारासाठी दाखल झाले. महापालिका रूग्णालय व शासकीय रूग्णालयात रूग्णांची संख्या मोठी आहे. शासकीय रूग्णालयात सुमारे ५० रूग्णांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असून रूग्णांसाठी खाटा उपलब्ध नसल्याने रूग्णांना जमिनीवर व्हरांड्यात जागा मिळेल तेथे ठेवण्यात आले आहे. रूग्ण वाढत असल्याने आज दिवसभर महापालिका व शासकीय रूग्णालयातील डॉक्टरांची, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू होती. सिव्हिलमध्ये जागेअभावी अनेक रूग्णांवर बाह्यरूग्ण विभागात उपचार सुरू होते. खासगी रूग्णालयात रात्रभर रूग्णांची आवक सुरू होती. भारतनगर, गुरूवार पेठ, मुजावर गल्ली, नदीवेस, मालगाव वेस, म्हैसाळ वेस, वखार भाग, ब्राह्मणपुरी या दाट लोकवस्ती असलेल्या भागातील रूग्णांची संख्या मोठी आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यात अपयशी ठरल्याची तक्रार नागरिकांनी केली. महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. शहा यांच्याशी संपर्क साधला असता, मिरजेत दूषित पाण्यामुळे कॉलरा व गॅस्ट्रो या साथीच्या आजाराची लागण झालेले ११७ रूग्ण असल्याची त्यांनी माहिती दिली. १३ जणांना कॉलरा व १०४ जणांना गॅस्ट्रोची लागण झाली असून ब्राह्मणपुरी परिसरातील रूग्णांची संख्या जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य विभागातर्फे शहरात रूग्णांचे सर्वेक्षण सुरू असून पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाचे कर्मचारी दूषित पाणीपुरवठ्याचे कारण शोधत आहेत. पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून काही ठिकाणी जलवाहिनीला गळती लागून सांडपाणी मिसळल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे डॉ. शहा यांनी सांगितले. नागरिकांनी पाणी उकळून व गाळून पिण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. (वार्ताहर)ब्राह्मणपुरी परिसरात सर्वाधिक रुग्णब्राह्मणपुरी परिसरातील रूग्णांची संख्या मोठी आहे. पाठक अनाथाश्रमातील नऊ बालकांना गॅस्ट्रोची लागण झाल्याने त्यांना उपचारासाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी राघव पाठक, (वय दीड वर्ष), गणेश पाठक (सहा महिने), राजवीर पाठक (तीन वर्षे) यांना कॉलऱ्याची लागण झाली आहे. फातिमा सय्यद (१०) या बालिकेसही कॉलऱ्याची लागण झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस. एम. वाघ यांनी सांगितले.
मिरजेत गॅस्ट्रो, कॉलऱ्याचे दीडशेवर रुग्ण
By admin | Updated: November 22, 2014 00:01 IST