लोकमत न्यूज नेटवर्क
जत : राजकीय व इतर व्यासपीठांवरून नेहमी फटकेबाजी करणाऱ्या मंत्र्यांनी आमदार विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुका क्रीडा संकुल येथे आयोजित केलेल्या आमदार चषक क्रीडा स्पर्धेत प्रारंभी जोरदार फटकेबाजी केली. कृषिमंत्री दादा भुसे, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी मैदानात उतरुन क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला.
आमदार विक्रम सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त जत तालुका युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्याहस्ते करण्यात आले. कृषिमंत्री दादा भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत क्रिकेट सामन्याचा प्रारंभ झाला. स्टेजवरील भाषणातून नेहमीच फटकेबाजी करणाऱ्या या मंत्र्यांनी क्रिकेटच्या मैदानात उतरून फटकेबाजी केली. या तिघांसाठी आमदार विक्रम सावंत यांनी गोलंदाजी केली.
यावेळी ॲड. युवराज निकम, गणेश गिड्डे, अतुल मोरे, नीलेश बामणे, बाबासाहेब कोडग, आप्पू बिराजदार, फिरोज नदाफ, संतोष भोसले, सुजय शिंदे, संतोष कोळी, परशुराम मोरे आदी उपस्थित होते.