सांगली : महापालिका प्रशासनाने सत्तर लाखांच्या निविदेत मोठा घोळ घातला आहे. या निविदेला महापौरांनी विरोध केला असतानाही प्रशासनाने परस्परच निविदा मागविल्या आहेत. मिरजेतील कचरा डेपोची कुंपण भिंत बांधण्याच्या कामाच्या दोन निविदा मागविण्यात आल्या आहेत. आयुक्तांच्या अधिकारात हे काम बसविण्यासाठी प्रशासनाने हातचलाखी केल्याचा आरोप होऊ लागला आहे. याबाबत आयुक्तांना पदाधिकारी जाब विचारणार आहेत. समडोळी व बेडग रस्त्यावरील कचरा डेपोला कुंपण भिंत घालणे, प्रभाग पाचमधील गटार कामाची सत्तर लाख रुपयांची निविदा बुधवारी प्रसिद्ध झाली. या निविदेत बेडग रस्त्यावरील कचरा डेपोला सभोवती कुंपण भिंत बांधण्यासाठी २१ लाख ५९ हजार, तर याच डेपोला उत्तर बाजूला भिंत बांधण्यासाठी ६ लाख २९ हजाराची निविदा मागविली आहे. एकदा सभोवती भिंत म्हटल्यावर पुन्हा उत्तर बाजू कशी आली? असा सवाल होऊ लागला आहे. आयुक्तांना २५ लाखापर्यंतची कामे मंजूर करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे हे काम मर्यादेत बसविण्याची चलाखी प्रशासनाने केली आहे. या निविदेतील कामे कोणत्या निधीतून करण्यात येणार आहेत, याचा उल्लेखच केलेला नाही. कचरा डेपोचे काम घनकचरा व्यवस्थापनासाठी विभागीय आयुक्तांकडे जमा केलेल्या २० कोटीतून केले जाणार असेल, तर त्याचा उल्लेख करणे अपेक्षित होते. त्यशिवाय विभागीय आयुक्तांनी या निधीतून करावयाच्या कामाची यादी दिली आहे. पण त्याची माहितीही पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे आयुक्तांच्या कारभाराबद्दल पदाधिकाऱ्यांत असंतोष वाढू लागला आहे. (प्रतिनिधी)
सत्तर लाखांच्या निविदेत घोळ
By admin | Updated: July 30, 2015 00:24 IST