ओळी : शहरातील संभाव्य पूरस्थितीबाबत शुक्रवारी महापालिकेत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह पूरपट्ट्यातील नगरसेवक उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरात पूरपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांनी स्वत:हून स्थलांतरित व्हावे, यासाठी महापालिकेच्यावतीने नोटीस बजाविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महापौर दिग्विजय सूर्यवंशी व आयुक्त नितीन कापडणीस यांनी संभाव्य पूरस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी पूरपट्ट्यातील नगरसेवक धीरज सूर्यवंशी, अजिंक्य पाटील, सुबराव मद्रासी, संजय यमगर, फिरोज पठाण, मंगेश चव्हाण, प्रकाश मुळके, नसीमा नाईक, वर्षा निंबाळकर, अपर्णा कदम यांच्यासह प्रभाग समितीचे सहायक आयुक्त व सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी नगरसेवकांच्या सूचना महापौर आणि आयुक्तांनी जाणून घेतल्या. संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्यापूर्वीच पूरबाधित भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यासह महापालिकेकडून कोणतीही नुकसानभरपाई दिली जाणार नाही, अशी नोटीस बजावण्याची सूचना सर्वच नगरसेवकांनी केली. पुराच्या काळात आवश्यक औषधे, साथीचे आजार उद्भवल्यास त्याबाबत लागणारी औषधे उपलब्ध करून द्यावीत. पाणीपुरवठा करणारे पंप पुराच्या पाण्याखाली जातात. त्यामुळे शहरात असणाऱ्या कूपनलिका दुरूस्त करून त्याद्वारे पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची सूचना मांडण्यात आली.