कवठेमहांकाळ : हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर एका आठवड्यात म्हैसाळ उपसा सिंचन योजना कायमस्वरुपी सुरू करण्यासाठी निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते आमदार अजित पवार, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील यांनी दिली. त्यामुळे हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर म्हैसाळ योजना सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे. सुमनताई पाटील यांच्या आंदोलनास यश आले आहे.नागपूर येथील विधानभवनासमोर सुमनताई पाटील, गणपतराव देशमुख, जयंत पाटील यांच्यासह अन्य आमदारांनी उपोषण केले. दुष्काळी भागातील पाणी योजना सुरू करून येथील शेतकऱ्याला जीवनदान द्यावे, म्हैसाळ योजना सुरू करण्याच्या मागणीबरोबरच मटका बंद करण्याचा, डान्स बार बंदीचा नवा कायदा करा, या मागण्या करण्यात आल्या. या उपोषणाची दखल घेत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनामध्ये मदत आणि पुनर्वसनमंत्री एकनाथ खडसे, मंत्री गिरीश बापट, ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार अजित पवार, पतंगराव कदम, जयंत पाटील, सुमनताई पाटील, गणपतराव देशमुख, अनिल बाबर, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. मात्र योजना सुरू करण्याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे सांगितले. अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करण्याचे आश्वासन दिले. रात्री उशिरा पवार यांनी चर्चा केली.सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाची स्थिती भीषण असल्यामुळे म्हैसाळ योजना सुरू करावी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज पूर्व भाग, सांगोला तालुक्याला पाणी द्यावे, अशी मागणी केली. (वार्ताहर)आंदोलन स्थगितमुख्यमंत्र्यांनी अधिवेशनानंतर आठवड्यात म्हैसाळ योजना सुरू करण्याचे आश्वासन दिल्यामुळे, राष्ट्रवादीने जाहीर केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. शुक्रवारी कवठेमहांकाळ बंद केले जाणार नाही. सोमवारपासूनचे उपोषणही स्थगित केले.
‘म्हैसाळ’ कायमस्वरूपी पूर्ववतचे आश्वासन
By admin | Updated: December 17, 2015 22:52 IST