मिरज : म्हैसाळ योजनेचे २५ आॅगस्टपासून दीड महिना सुरू असलेल्या आवर्तनाचे सुमारे ८ कोटी रूपये वीज बिल झाले आहे. पाण्याची आवश्यकता नसल्याने व वीज बिलाची थकबाकी १८ कोटींपर्यंत गेल्याने ‘म्हैसाळ’चे पाणी बंद करण्यात आले आहे.आवर्षण व पाणी टंचाईमुळे म्हैसाळ योजनेतून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पाणी सोडण्यात आले. पहिल्या ते पाचव्या टप्प्यापर्यंत ७३ पंपांद्वारे उपसा करण्यात आला. टंचाई परिस्थितीमुळे दीड महिना ‘म्हैसाळ’चे आवर्तन सुरू ठेवून जतपर्यंत तलाव भरण्यात आले. म्हैसाळ योजनेच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. मात्र वीज बिलाची थकबाकी वाढत असल्याने बुधवारी रात्री ‘म्हैसाळ’चा पाणी उपसा थांबविण्यात आला. म्हैसाळ योजनेचे आॅगस्ट महिन्याचे ७७ लाख, सप्टेंबर महिन्याचे ५.२८ कोटी व आॅक्टोबर महिन्यातील सुमारे दीड कोटी रूपये वीज बिल आहे. त्यामुळे पूर्वीच्या १० कोटी थकित वीज बिलात आणखी ८ कोटीची भर पडली आहे. १८ कोटी वीज बिलाशिवाय सुमारे दहा कोटी थकित पाणीपट्टी आहे. ‘म्हैसाळ’च्या थकित वीज बिल व पाणीपट्टीचा बोजा लाभार्थी शेतकऱ्यांच्या सात-बारावर चढविण्यात येणार आहे. मात्र शेतकऱ्यांनी या निर्णयास विरोध केल्याने म्हैसाळ योजनेच्या वाढत असलेल्या थकबाकीबाबत शासन कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)वसुलीचा मुद्दा चर्चेत---आजअखेर टंचाई निधीतून वीज बिल भरून पाणी वापरण्यास मिळणाऱ्या शेतकऱ्यांना आता थकबाकीची चिंता सतावू लागली आहे. शुक्रवारपासून लाभार्थ्यांकडून योजनेच्या थकबाकीची वसुली करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. पाटबंधारे विभागाने त्यासंदर्भातील सर्व तयारी पूर्ण केली असल्याचे सांगण्यात आले.
म्हैसाळ योजनेची थकबाकी गेली २८ कोटींच्या घरात...
By admin | Updated: October 16, 2015 00:55 IST