इस्लामपूर : येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रेसर संशोधन संस्था ऑटोमोटिव्ह रिसर्च असेसिएशन ऑफ इंडिया, पुणे यांच्यामध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सामंजस्य करार झाला.
या करारामुळे ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑटोमोटिव्ह टेक्नॉंलॉजी ही एम. टेक. पदव्युत्तर पदवी प्राप्त करण्याची संधी उपलब्ध होत आहे. दोन वर्षांचा हा अभ्यासक्रम करीत असताना विद्यार्थ्यांना आरआयटीबरोबरच एआरएआय, पुणे येथेही शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संशोधन संस्थेतील तंत्रज्ञान, चाचण्या यांची माहिती मिळण्यासह भारतातील नामांकित संशोधन संस्थेतील अनुभवाची संधीही मिळणार आहे.
एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई म्हणाले, ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञान आणि कौशल्ये यांचा अभ्यास असणे गरजेचे आहे. ही गरज लक्षात घेऊन हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. या सामंजस्य करारावेळी आरआयटीच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, डॉ. के. सी. व्होरा, आरआयटीचे ऑटोमोबाईल इंजिनियरिंग विभागप्रमुख डॉ. संजय कुंभार, डॉ. एस. आर. पाटील आणि डॉ. एल. एम. जुगुलकर उपस्थित होते.