लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या कुपवाड ड्रेनेज, सुधारित शेरीनाला योजना, आपत्ती व्यवस्थापन आराखड्यासह विविध प्रकल्पांबाबत गुरुवारी मंत्रालयात बैठक घेऊन निधीचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही पालकमंत्री जयंत पाटील यांनी मंगळवारी महापालिकेच्या आढावा बैठकीत दिली.
महापालिकेतील सत्तांतरानंतर मंगळवारी पालकमंत्री जयंत पाटील प्रथमच सांगली महापालिकेत आले. त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या आढावा बैठकीला कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, विशाल पाटील, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, आयुक्त नितीन कापडणीस, माजी महापौर सुरेश पाटील, राहुल पवार, शेखर माने उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, महापालिका क्षेत्रात मोठ्या विकास प्रकल्पांबरोबर नगरसेवकांच्या वॉर्डातील लहानसहान कामेही झाली पाहिजेत. येत्या अडीच वर्षांत काही प्रकल्प पूर्ण करू, तर काही कामांना सुरुवात करण्याचे नियोजन आहे. कुपवाड ड्रेनेज योजना, सुधारित शेरीनाला योजना यासह महापालिकेच्या योजना, कामांसंदर्भात गुरुवारी चार वाजता मंत्रालयात बैठक घेऊन निधीसाठी प्रयत्न करू.
डॉ. कदम म्हणाले, शहराच्या चांगल्या भविष्यासाठी महापालिकेत परिवर्तन होऊन इतिहास घडला आहे. महापालिकेने कोरोनाच्या काळात चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळात शहराच्या विकासासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली. जयश्री पाटील म्हणाल्या, सांगलीकडे सर्व नेत्यांनी लक्ष दिले आहे. त्यामुळे निश्चितपणे विकास होईल. नवीन उद्योग आणले पाहिजेत. तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे. सांगलीच्या विकासासाठी सर्वजण एकत्र येऊन काम करतील.
आयुक्त कापडणीस यांनी महापालिकेच्या विविध योजना, कामे व त्यासाठी आवश्यक निधीची माहिती दिली. ते म्हणाले, कुपवाड ड्रेनेज योजनेसह शेरीनाला सुधारित योजना, आपत्ती व्यवस्थापन केंद्रांचा आराखडा शासनाला सादर केला आहे. मिरज दर्गा विकास आराखड्याला मंजुरी मिळाली असून, अल्पसंख्यांक विभागाच्या शासन निर्णयाची गरज आहे. रस्ते, काळीखण सुशोभिकरण, उद्याने, क्रीडांगण विकास, नाले बांधकाम, अभयनगर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, प्रतिनियुक्त्यांची रिक्त पदे, अग्निशमन व आणीबाणी सेवेसंदर्भातील गरजा, उपभोगकर्ता कर रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव, महापुरात नुकसान झालेल्या मालमत्तेच्या दुरुस्तीचे रखडलेले अनुदान, मंजूर विकास योजनेचे रखडलेले नकाशे, गुंठेवारी भागात मूलभूत सुविधा याकडे लक्ष वेधले. विविध विकासकामांची माहिती दिली. काळीखण सुशोभिकरण, महापालिकेची प्रस्तावित नवीन इमारतीचे प्रझेंटेशन करण्यात आले. बदली, मानधनी, रोजंदारी कर्मचार्यांच्या मागण्या, कर्मचारी, अधिकार्यांची रिक्त पदे यासंदर्भात निवेदन तयार करून द्या, प्रश्न सोडवू, असे आश्वासन जयंत पाटील यांनी महापालिका कामगार सभेला दिले.
विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, विजय घाडगे, शेडजी मोहिते, विष्णू माने, वहिदा नायकवडी, संगीता हारगे, अभिजित हारगे, शुभांगी साळुंखे, योगेंद्र थोरात, संतोष पाटील या नगरसेवकांनी प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले. विकास कामांसंदर्भात महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले.
चौकट
सभेतील चर्चा
१. सांगलीत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम तसेच मिरजेतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचा विकास करण्यासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने तयार करण्याची सूचना
२. वसंतदादा स्मारक ते सांगली बंधार्यापर्यंत घाट सुशोभिकरणाचा निर्णय. सांगलीवाडी बंधारा पाडून नवीन मोठा बांधण्याचा निर्णय
३. महापालिका क्षेत्रातील प्रमुख चौकांच्या सुशोभिकरणासाठी पुण्या-मुंबईच्या बड्या आर्किटेक्टकडून आराखडे बनवून घेणार
४ मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधील फुटबाॅल मैदान २५ वर्षे कराराने दिल्यास ‘फिफा’च्या माध्यमातून विकसित करण्याची ग्वाही
चौकट
नाट्यगृहासाठी दोन जागांचे प्रस्ताव
सांगली शहरात अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्याची गरज आहे. हनुमाननगर येथे सहा एकर जागा तसेच कोल्हापूर रोडलगत अडीच एकर जागा उपलब्ध आहे. नाट्यगृह उभारणीसाठी प्रस्ताव सादर केला जाईल. त्यासाठी शासनाकडून निधी मिळावा, अशी मागणी आयुक्त कापडणीस यांनी केली.