अंकलखोप : औदुंबर (ता. पलूस) येथील श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने अंकलखोप येथील हुतात्मा भगतसिंग हायस्कूल कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन रुग्णांना मोफत भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
अत्यंत उत्तम दर्जाचे जेवण बनवून त्याचे पॅकिंग करून दिले जाते.
दररोज सकाळी व सायंकाळी श्री दत्त सेवाभावी मंडळाचे कर्मचारी कोविड सेंटरमध्ये जाऊन रुग्णांना जेवण पोहोच करतात. मागील वर्षी ग्रामपंचायत व विविध संस्थांनी चालवलेल्या कोविड सेंटरसाठी श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या वतीने बेड उपलब्ध केले होते. अन्य मदतीसाठी संचालक मंडळ नियमितपणे लक्ष देऊन कार्यरत होते. यावर्षी सांगली येथे कोरोना रुग्ण व नातेवाइकांना जेवण देणाऱ्या संस्थेला आर्थिक मदत दिली आहे.
अंकलखोपचे सरपंच अनिल विभुते म्हणाले, श्री दत्त सेवाभावी मंडळाचा विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग असतो. कोरोना काळात दोन वर्षे ग्रामपंचायत राबवत असलेल्या उपक्रमात
मोलाची साथ दिली आहे. श्री म्हसोबा अन्नछत्र मंडळ यांनी रुग्णांच्या नाश्त्याची सोय केली आहे.
यावेळी अध्यक्ष दीपक सूर्यवंशी, उपाध्यक्ष अमर पाटील, सचिव धनंजय सूर्यवंशी, विजय पाटील, हेमंत मिरजकर, वैभव सूर्यवंशी, गौरव पाटील, इंद्रजित सूर्यवंशी उपस्थित होते.