अशोक पाटील - इस्लामपूर बसस्थानकामागील परिसर ‘मायाबाजार’ बनू लागला आहे. या परिसरात राजरोस रस्त्यावर जुगार खेळला जातो. शिवाय सकाळी व दुपारी महिला व मुलींना रोडरोमिओंचा त्रास होत आहे. त्यांना काही गुंडांचा आशीर्वाद असून, याकडे पोलिसांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे.सध्या बसस्थानकामागील मोकळ्या जागेत विविध प्रकारचे जुगाराचे खेळ खेळले जातात. त्यातून सर्वसामान्यांना लुटले जात आहे. परिसरातील काही टपऱ्यांतून छुप्या पध्दतीने मटका घेतला जातो. काही टपऱ्यांमधून अश्लील चित्रफितींची विक्रीही केली जाते. याच मार्गावर बोरगाव, ताकारीकडे जाणाऱ्या वडापच्या वाहनांची मोठी गर्दी असते. ही वाहने दुकानांसमोर लावली जात असल्याने अनेकवेळा वादावादीचे प्रकार घडले आहेत. वाहनांमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावल्याने या मार्गावरुन ये—जा करणाऱ्या प्रवासी व महिला वर्गाला त्रास होत असतो.शहरात सर्व प्रकारची महाविद्यालये असल्याने ग्रामीण भागातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुला—मुलींची संख्या मोठी आहे. सकाळी सात ते दुपारी बारापर्यंत या मार्गावर महाविद्यालयीन युवतींचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. यामुळेच या वेळेत येथे रोडरोमिओ येथे उभे राहून मुलींची टिंगल करताना दिसतात. बसस्थानकावरील परिस्थिती तर अधिकच गंभीर बनली आहे. दररोज हजारो प्रवासी ये—जा करणाऱ्या बसस्थानकासाठी केवळ एका पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. हे महाशय नारळाच्या झाडाखाली सावलीचा आसरा घेऊन बसस्थानकावर नजर ठेवून असतात. त्यामुळे खिसेकापूंनी फायदा उठवला आहे. हे सर्व पोलिसांना माहीत असूनही याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले जाते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन बसस्थानक परिसरात सुरू असलेले सर्व अवैध धंदे बंद करावेत, तसेच रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बसस्थानक परिसर बनतोय मायाबाजार
By admin | Updated: February 7, 2015 00:15 IST