मिरज : गेल्या दीड वर्षापासून कोरोना साथ व लॉकडाऊनमुळे पूर्णपणे व्यापार व व्यवसाय ठप्प असल्याने मौलाना अबुल कलाम आझाद महामंडळाकडून अल्पसंख्याकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी बहुजन वंचित आघाडीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यांत आली.
मौलाना आझाद महामंडळांकडून अल्पसंख्याकांना उद्योग व्यवसायासाठी गेल्या पाच वर्षांत एक रुपयाही दिला नाही. आघाडी शासनाने मौलाना आझाद महामंडळाकडून सर्वसामान्य अल्पसंख्याकांना कर्जस्वरूपात आर्थिक मदत करावी. शैक्षणिक कर्ज मर्यादा ५ लाखांवरून वाढवून ती २० लाखांपर्यंत करावी. कर्जवितरण गतीने होण्यासाठी महामंडळाच्या विविध जिल्ह्यात कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी. शैक्षणिक कर्जासोबत व्यवसाय व उद्योगधंद्यासाठी कर्ज योजना सुरू करावी.
याबाबत तातडीने व्यवस्था करून अल्पसंख्याकांना न्याय द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीतर्फे उपजिल्हाधिकारी मोसमी बेर्डे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. मागण्या मान्य न झाल्यास वंचित बहुजन आघाडीकडून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे, उमरफारूक ककमरी, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, विकास कोलप, विनोद कदम, प्रमोद मल्लाडे यांनी दिला.