इस्लामपूर : वाळवा तालुक्यात सुरू असलेल्या मटका, ताडी आणि दारू विक्री अशा अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करून ते बंद करावेत, अन्यथा दलित महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गुरुवारी देण्यात आला. येथील तहसील कचेरीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मटका फोड आंदोलन झाले.
महासंघाचे सरचिटणीस शंकर महापुरे, सीमा आवळे, विकास बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील अनेक गावांत अवैध व्यवसाय सुरू आहेत. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. ताडी केंद्रात भेसळयुक्त ताडीची विक्री होत आहे. सर्व गावात मटका सुरू आहे. पोलिसांना हाताशी धरून चोरून दारू विक्री सुरू आहे. हे सर्व अवैध धंदे तातडीने बंद करावेत.
यावेळी संतोष नवाळे, बापूराव बडेकर, दीपक मिसाळ, भास्कर चव्हाण, रवी बल्लाळ, रमेश सकटे, ज्योती अवघडे, यशवंती चांदणे, अधिकराव देवकुळे, अनिल थोरात उपस्थित होते.
फोटो-
इस्लामपूर येथे दलित महासंघाच्या वतीने अवैध धंद्यांविरुद्ध मटका फोड आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार रवींद्र सबनीस यांना शंकर महापुरे यांनी निवेदन दिले. सीमा आवळे, विकास बल्लाळ, संतोष नवाळे उपस्थित होते.