वाळवा : नियमाव्यतिरिक्त ऊसतोडणी मजूर व वाहतूकदारांना पैसे कुणीही देऊ नयेत, अशा सूचना दिल्या असून, पैसे घेतल्याचे आढळून आल्यास ऊसतोडणी व वाहतूकदारांच्या बिलातून त्याची वसुली केली जाईल. कारखान्याकडे नोंद असलेला ऊस तोडणी झाल्याशिवाय हुतात्मा साखर कारखाना बंद केला जाणार नाही, असा विश्वास अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी दिली.
२०२०-२१ चा हुतात्म्याचा गळीत हंगाम सुरू असून, १२३ दिवसांत चार लाख ९६ हजार १०० टन उसाचे गाळप करून पाच लाख ८९ हजार १२५ साखर पोत्यांचे उत्पादन घेतले. यातून ११.९३ टक्के उतारा मिळाला. यावर्षीच्या हंगामात अतिवृष्टी, कोरोना, अपुरी तोडणी व वाहतूक यंत्रणा यामुळे ऊसतोडणी मजुरांकडून शेतकऱ्यांना ऊसतोडणीसाठी आर्थिक मोबदला मागितला जात आहे; परंतु कोणीही पैसे देऊ नये असे कारखान्याने परिपत्रक काढून आवाहन केले आहे.
ते म्हणाले, शेतकऱ्यांनी आपला नोंदीचा शिल्लक ऊस कारखान्यास पाठवावा. कारखान्यांना प्रशासन तोडणी यंत्रणा कमी पडू देणार नाही. संपूर्ण ऊस गाळप करण्यात येईल आणि मगच कारखाना बंद केला जाईल.
यावेळी उपाध्यक्ष बाबूराव बोरगावकर, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, शेती अधिकारी पी. ए. चव्हाण, ऊस विकास अधिकारी सावंता माळी उपस्थित होते.