सांगली : शहरतील पंचशीलनगर परिसरात चारित्र्याच्या संशयावरून विवाहितेस चामडी पट्टा, गॅसच्या पाइपने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पूनम योगेश भोसले यांनी पती योगेश सोपान भोसले व सासू सुनीता सोपान भोसले (दोघेही रा. जाधव प्लॉट, पंचशीलनगर, सांगली) यांच्याविरोधात शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील पंचशीलनगर येथील शिंदे मळा जाधव प्लॉट परिसरात भोसले राहण्यास आहेत. बुधवार, दि. २२ रोजी सकाळी ११च्या सुमारास फिर्यादी पूनम यांना पती योगेश याने चारित्र्याच्या संशयावरून चामडी पट्टा, गॅसची पाइप, कुकरचे भांडे व काठीने मारहाण केली व जिवे मारण्याचीही धमकी दिली. सासू सुनीता हिने शिवीगाळ करत मारहाण करत पूनम यांच्या आई, मामा, चुलते यांना शिवीगाळ करत दमदाटी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पूनम यांच्या पती व सासूविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.