सांगली : मराठा आरक्षणाविषयी केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात मराठा स्वराज्य संघातर्फे मंगळवारी (दि. १३) सांगलीत धरणे आंदोलन केले जाणार आहे. संघाचे अध्यक्ष महादेव साळुंखे यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले की, मराठ्यांचे आरक्षण केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळेच अडकले आहे. आरक्षणाचा कायदा करण्याची जबाबदारी केंद्राचीच आहे. राज्याकडून त्याचे अधिकार केंद्राने कधीच काढून घेतले आहेत. मात्र, खोटेपणा करत राज्यावर जबाबदारी ढकलली जात आहे. भाजपमधील मराठा नेतेदेखील आरक्षणामध्ये झारीतील शुक्राचार्य ठरले आहेत. पक्षनिष्ठेपुढे स्वत:च्या समाजाचे हितही त्यांना दिसेना झाले आहे. मराठ्यांनी राज्यात ५७ मोर्चे काढूनही केंद्र सरकार गंभीर नसेल तर मराठे ताकद दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. रस्त्यावर येऊन आक्रोश करतील. याचाच एक भाग म्हणून निदर्शने केली जाणार आहेत. मराठा आरक्षण, वाढती महागाई व बेरोजगारी, कोरोनासाथ रोखण्यात आलेले अपयश या मुद्द्यांवर आंदोलन होईल. स्टेशन चौकात गांधी पुतळ्यासमोर निदर्शने होतील.