सांगली : अनेक भारतीय महापुरुषांनी, विचारवंतांनी आणि यशस्वी लोकांनी दिलेल्या विचारामागचे रहस्य, यशाचे गणित आणि मनाच्या शक्तीचा वापर करण्याचे तंत्र यांचा उलगडा मिस हिमानी यांनी सांगलीतील कार्यक्रमात केला. त्यांच्या या कार्यक्रमास ‘सखी मंच’ सदस्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी हवा असलेला मंत्र खास सखी मंच सदस्य व त्यांच्या परिवाराला देण्यासाठी अहमदाबाद येथील मिस हिमानी यांचा कार्यक्रम नुकताच सांगलीतील एसएफसी मेगा मॉलमधील सभागृहात पार पडला. सखी मंच सदस्य, त्यांचे कुटुंबीय व अन्य लोकांनीही या महासेमिनारमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी हिमानी म्हणाल्या की, मनाच्या शक्तीचा वापर करून यश व आनंद मिळविता येतो. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात लहान मुलांपासून अबाल-वृद्धांपर्यंत सर्वांच्याच चेहऱ्यावरचे हास्य आणि जगण्यातील आनंद हरवला आहे. प्रश्नांकित चेहऱ्याने प्रत्येकजण धावत आहे. जगभरातील महापुरुषांनी यापूर्वी दिलेल्या मंत्राचा विसरही सर्वांना पडला आहे. शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य यांचा जवळचा संबंध आहे. त्यामुळे आपण आयुष्याच्या पूर्वार्धात पैशाच्या मागे धावताना शारीरिक आणि मानसिक आरोग्य हरवून बसतो आणि उत्तरार्धात मिळविलेला पैसा शारीरिक आणि मानसिक आरोग्य मिळविण्यात खर्ची घालतो. यशस्वी जीवनाचा आणि त्यासाठीच्या मंत्राचा नेमका अर्थ, त्याचे शास्त्र या गोष्टींचा उलगडा यावेळी त्यांनी केला. दैनंदिन जीवनात येणाऱ्या छोट्या-छोट्या समस्यांपासून मोठ्या संकटांपर्यंत प्रत्येक गोष्टींसाठीचे उत्तर व त्यातूनही जीवन जगण्यासाठी लागणारी ऊर्जा मिळविण्याचा एक भन्नाट मार्ग या कार्यक्रमातून त्यांनी सखी सदस्यांना दिला. (प्रतिनिधी)ऊर्जेचे प्रात्यक्षिक प्रत्येकाच्या आरोग्य, अर्थविषयक, करिअर, नातेसंबंध व ताण-तणाव यासंदर्भातील सर्व प्रश्नांची उत्तरे या कार्यक्रमात मिस हिमानी यांनी दिली. सकारात्मक व नकारात्मक ऊर्जेचा स्रोत, त्याचे परिणाम याचे प्रात्यक्षिकही त्यांनी सखींना दाखविले.
सखींना मिळाला मनाच्या शक्तीचा मंत्र
By admin | Updated: October 6, 2015 00:34 IST