लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : येथील श्रावस्ती बुद्धविहारातर्फे प्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक हृदयमानव अशोक यांच्या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बुद्ध तत्त्वज्ञान, मानवता, बाबासाहेबांचे विचार, समता आणि माणुसकी आदी विषयांवरील बहारदार आणि माणूस जोडणाऱ्या कवितांचं सादरीकरण झाले.
अध्यक्षस्थानी डॉ. नामदेव कस्तुरे होते.
यावेळी
‘एन्काउण्टर करा माणसाचा नाही,
मानसिकतेचा, माणूस वाचला पाहिजे,
समतेचा मार्ग टिकवण्यासाठी’
या कवितेने उपस्थितांची मने जिंकली. मानवतेच्या वाटेवर चालताना आपला माणूस वाचवून मानसिकता संपविण्याचे आवाहन या कवितेतून करण्यात आले. कवितेतून महापुरुषांच्या विचारांना मुक्त करून सकल मानवजातीसाठी एकत्रित आलं पाहिजे असं सांगण्यात आलं.
‘मधलं बोट दाखवलं पाहिजे, घोळक्या घोळक्याने ढेकळातलं ढेकळं न कळणाऱ्यांना’ या कवितेतून शेतकरी आंदोलनाला समर्थन तर विरोध करणाऱ्यांवर ताशेरे ओढण्यात आले. ग्लोबल आंबेडकर, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ग्रंथालयात जायचं पुस्तकांना घ्यायचं, तुझ्यात फक्त दम पाहिजे, एक वर्ग, तू फक्त तू आहेस, पुतळे, दहशतवादाचे टेंडर आदी कवितांचे सादरीकरण करण्यात आले.
डॉ. नामदेव कस्तुरे म्हणाले, समाजाने कलाकारांना जोपासले पाहिजे. सर्वार्थाने त्यांंच्या पाठीशी राहिले पाहिजे. समाजपरिवर्तन शक्य आहे. हृदयमानव अशोक या तरुण कवीच्या कविता म्हणजे वर्तमान समाज समस्यांवर घाव घालण्याची व त्यातून नवी वाट दाखविण्याची क्षमता असणाऱ्या कविता आहेत.
यावेळी डॉ. जगन कराडे, डॉ. रवींद्र श्रावस्ती, आयु. सुधीर कोलप, आयु. दयानंद कोलप, डॉ. सोनिया कस्तुरे आदी उपस्थित होते. प्रा.अशोक भटकर यांनी सूत्रसंचलन केले. चंद्रकांत नागवंशी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. संजीव साबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन सोनुताई कांबळे, प्रा. अशोक भटकर, अरुण कांबळे, पवन वाघमारे, दीपक कांबळे आदींनी केले होते.