विटा : शहरासह तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोनाची लस उपलब्ध नाही. यामुळे ४५ वर्षांपुढील नागरिकांत प्रचंड चिंता निर्माण झाली आहे. या नागरिकांसाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस तातडीने उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी केली. याबाबतचे पत्र बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिले.
विटा शहरासह खानापूर तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून कोरोनाची लस उपलब्ध नाही. त्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना पहिला डोस अद्यापी मिळाला नाही. तसेच ४५ वर्षांच्या पुढील ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे, त्यांना ५५ ते ६० दिवस झाले तरी दुसरा डोस मिळाला नाही. त्यामुळे प्रशासनाने ४५ वर्षांच्या पुढील नागरिकांसाठी कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लस तातडीने उपलब्ध करावी तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लोकांसाठी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी सुरू असलेल्या पद्धतीत बदल करावा व त्यांनाही लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.