लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सध्या ग्रामपंचायतीवर नागरी सुविधा देताना ताण पडत असल्याने माधवनगरची नगरपालिका करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी ग्रामपंचायतीचे उपसरपंच तसेच सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.
शिवसेनेचे माजी पदाधिकारी व माधवनगरचे विद्यमान उपसरपंच बाळासाहेब मगदूम यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी साहेब यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, माधवनगरची सध्या अंदाजे लोकसंख्या ३० ते ३५ हजारांच्या घरात असल्याने स्वतंत्र नगरपालिका होण्यास ही लोकसंख्या पुरेशा प्रमाणात आहे. माधवनगर शहर सांगली-मिरज महापालिकेच्या अगदी सीमेलगत असल्याने या शहराचा खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी व औद्योगिक विकास झाला आहे.
त्याअनुषंगाने राज्य सरकारने व जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र नगरपालिका करावी. सध्या ग्रामपंचायतीवर नागरी सुविधा देताना ताण पडत आहे. लोकसंख्येच्या मानाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाकडून अत्यल्प प्रमाणात निधी येत असल्याने या ठिकाणी नागरी सुविधा देणे शक्य होत नसल्याने मर्यादा येत आहेत. नगरपालिका झाल्यास राज्य सरकारकडून दहापट मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होणार आहे. नगरपालिकेच्या माध्यमातून माधवनगर शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होऊन नागरी पायाभूत सुविधा देणे जनतेला शक्य होणार आहे.
यावेळी जिल्हाधिकारी चौधरी म्हणाले की, याबाबत नगरविकास खात्याला योग्य तो पाठपुरावा करून प्रस्ताव पाठविण्यात येईल. यावेळी विद्यमान सदस्य देवानंद जाधव, महेश साळुंखे, देवानंद जाधव, सतीश पाटोळे, प्रवीण जाधव, शिवसेनेचे जितेंद्र शहा, लक्ष्मण वडर, देवराज बागल, शिवसेना माधवनगर शहरप्रमुख किरण पवार, विशाल गोसावी आदी उपस्थित होते