कामेरी : एमपीएससीने नवीन नियम लागू केले आहेत. ते खुल्या व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहेत. त्यामध्ये योग्य ते बदल न झाल्यास राज्यभर आंदोलन करू, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य राज्य समन्वयक प्रवीण पाटील यांनी दिला.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर आता राज्यसेवा आयोगाने महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यापुढे युपीएसीप्रमाणेच आता राज्यसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी मर्यादा लागू केली आहे. खुल्या गटातून सहा; तर ओबीसी गटातून फक्त नऊवेळा परीक्षा देता येणार आहे.
राज्य लोकसेवा आयोगाने एक पत्रक प्रसिद्ध करून महत्वाची घोषणा केली आहे. त्याची अंमलबाजवणी ही २०२१ मध्ये प्रसिद्ध होणाऱ्या सर्व स्पर्धांना लागू होणार आहे. मराठा आरक्षणाचा विषय न्यायालयात प्रलंबित आहे. तो होईपर्यंत आयोगाने थांबणे आवश्यक आहे. कारण मराठा विद्यार्थ्यांनी जर खुल्या अथवा ईडब्ल्यूएसमधून अर्ज दाखल केला व उद्या सुनावणीत मराठा आरक्षण स्थगिती उठली; तर मराठा विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येणार नाही. त्याचा विचार करून योग्य ते बदल करण्याची मागणी प्रवीण पाटील यांनी केली आहे.