ओळ : मिरजेतील ॲपेक्स केअर रुग्णालयाचा संचालक डॉ.महेश जाधव याला शनिवारी पाेलिसांनी न्यायालयात हजर केले.
मिरज : मिरजेतील ॲपेक्स केअर कोविड रुग्णालयाचा संचालक डॉ.महेश जाधव यास न्यायालयाने सात दिवस पोलीस कोठडी दिली आहे. डाॅ.जाधव याने कोविड रुग्णांवर उपचाराच्या नावावर केलेल्या गैरप्रकारांची पोलिसांनी कसून चाैकशी सुरू केली आहे. मिरजेतील ॲपेक्स केअर कोविड रुग्णालयात दोन महिन्यांत तब्बल ८७ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ॲपेक्समधील रुग्णांच्या मृत्यूचे जिल्हा शल्यचिकित्सकांकडून डेथ ऑडिट करण्यात येणार आहे. सिव्हिलच्या डाॅक्टरांची समिती रुग्णांवर केलेल्या उपचारांची छाननी करणार आहे.
मिरजेतील डॉ.महेश जाधव यास सदोष मनुष्य वधप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी पुण्याला पळून जात असताना पाठलाग करून कासेगाव (ता.वाळवा) येथे अटक केली. गांधी चौक पोलिसांनी त्यास शनिवारी मिरज न्यायालयात हजर केले. कोविड रुग्णांवर उपचाराबाबत केलेल्या गैरप्रकारांच्या चाैकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी मान्य करुन न्यायालयाने डाॅ.जाधव यास दि. २६ पर्यंत पोलीस कोठडी दिली. या प्रकरणात डाॅ.जाधव याच्या रुग्णालयात वैद्यकीय कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अन्य सात जणांनाही पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. अॅपेक्स कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या ४५ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील उपचाराबाबत तक्रारीमुळे महापालिका प्रशासनाने त्याच्याविरुद्ध फिर्याद दिल्याने डाॅक्टरने रुग्णांच्या जीवाशी केलेला खेळ उघडकीस आला. अॅपेक्स कोविड रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा व तज्ज्ञ वैद्यकीय कर्मचारी नसतानाही दोन महिन्यांत २०५ रुग्ण दाखल करून घेण्यात आले. यापैकी ८९ रुग्णांचा मृत्यू झाल्याने पोलिसांना रुग्णांच्या मृत्यूच्या चाैकशी अहवालाची प्रतीक्षा आहे. डाॅ.जाधव याने आर्थिक फायद्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिविर इंजेक्शन आणावयास लावून, त्याचा वापर न करता इंजेक्शनची अन्यत्र विक्री केल्याचाही संशय आहे. डॉ.जाधव याने रुग्णालयातील सीसीटीव्ही चित्रण असलेला डाटा रेकाॅर्डर गायब केल्याचेही पोलिसांना आढळले आहे.
चाैकट
लाखाेंची बिले.. काेट्यवधीची कमाई
अॅपेक्स रुग्णालयात डाॅ.जाधव याने रुग्णांकडून लाखो रुपयांची बिले वसूल करून कोट्यवधी रुपयाची कमाई केल्याचा अंदाज आहे. डाॅ.जाधव याच्या मालकीच्या रेंजरोव्हर, मर्सिडिज यासह महागड्या गाड्या आहेत. ३५ लाख रुपये किमतीची परदेशी बनावटीची दुचाकीही त्याने बुक केल्याचे पोलिसांना आढळले आहे.