लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वैद्यकीय पेशाचे सारे नीतिनियम धाब्यावर बसवून ॲपेक्स केअर रुग्णालयाने कोरोनाकाळात धंदा केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका, आरोग्य विभाग या साऱ्याच यंत्रणांना फाट्यावर बसवत डॉ. महेश जाधव याने रुग्णांच्या जीविताशी खेळ केला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनाही दाद न देण्यापर्यंत मजल गेल्याचे प्रशासकीय पत्रव्यवहारातून दिसून आले आहे.
पोलिसांत धाव घेणारे पीडित डॉ. जाधवच्या अनेक कहाण्या सांगत आहेत. रुग्णसेवेतील अनागोंदी, आर्थिक लूट, बेमुरवतपणामुळे गेलेले बळी याच्या कहाण्या पोलीस तपासात पुढे येत आहेत. कोरोनाकाळात नव्या रुग्णालयांना परवानगी देण्यामध्ये जिल्हा प्रशासनाने लवचिकतेचे धोरण स्वीकारले होते, त्याचा नेमका फायदा डॉ. जाधवने उचलला. प्रशासनाने घातलेल्या अटी व शर्तींना धाब्यावर बसवले. त्याच्याविषयी तक्रारी झाल्यानंतर ॲपेक्समधील अनागोंदीकडे प्रशासनाचे लक्ष गेले. खुद्द महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना ॲपेक्समध्ये जाऊन पाहणी करण्याची वेळ आली. त्यावेळी बरेच गैरप्रकार, असुविधा व नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे नव्याने कोरोना रुग्ण दाखल करुन घेऊ नयेत, कोविड रुग्णालय बंद करावे अशा नोटिसा आयुक्तांनी काढल्या. डॉ. जाधवने नोटिसांना जुमानता रुग्ण घेणे सुरूच ठेवले होते. शेवटी प्रशासनाला फौजदारी गुन्हे दाखल करण्याची वेळ आली.
चौकट
रुग्णालय नव्हे, छळछावणीच
पहिल्या लाटेत विश्रामबागमधील आदित्य रुग्णालय चालवण्यासाठी डॉ. जाधव याने घेतले होते. तेथे पहिल्या दिवसापासूनच रुग्णांचा जीव रामभरोसे होता. रुग्णांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या पाइपमधील बिघाडाकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांचे प्राण कंठाशी आले. तेथील रहिवाशांनीही रुग्णालयाविषयी तक्रारी केल्या, त्यामुळे हे रुग्णालय मिरज रस्त्यावर मारुती मंदिरानजीक सध्याच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले. तेथील व्यवस्था म्हणजे जणू छळछावणीच होती.
चौकट
शल्यचिकित्सकांच्या पथकाला प्रवेशबंदी
रुग्णांच्या नातेवाइकांच्या संभाव्य हल्ल्यांच्या भीतीने पत्रे मारून अंतर्भागात प्रवेश प्रतिबंधित केला होता. महापालिकेकडे दाखल केलेल्या अर्जात विविध पात्रतेचे ५६ कर्मचारी असल्याचे सांगितले होते. जिल्हा शल्यचिकित्सकांनी त्याच्या पाहणीसाठी पथक पाठवले तेव्हा, अधिकाऱ्यांना आतच येऊ दिले नाही, असे शल्यचिकित्सकांनी सांगितले.