लाेकमत न्यूज नेटवर्क
पलूस : पलूस तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत कदम-लाड गटाचे वर्चस्व कायम राहिले आहे. पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र आलेल्या लाड-कदम गटाने तालुक्यातील १२ पैकी ९ ग्रामपंचायतींवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवून इतिहास घडवला. हे सख्य मतदारांच्या पचनी पडल्याचे निवडणूक निकालावरून स्पष्ट हाेत आहे.
विधानसभा निवडणुकीत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांना आमदार अरुण लाड यांनी केलेली मदत आणि त्याची परतफेड म्हणून कदम यांनी पदवीधरच्या निवडणुकीत अरुण लाड यांना निवडून आणण्यासाठी लावलेली ताकद, यामुळे पलूस-कडेगाव तालुक्यात कदम-लाड ऐक्याचे वारे वाहू लागले. त्याचे फलित ग्रामपंचायत निवडणुकीत दिसून आले. तालुक्यातील भिलवडी स्टेशन आणि खंडोबाचीवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित १२ गावांमध्ये निवडणूक लागली. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्र पक्ष तसेच भाजप आणि स्थानिक आघाड्यांनी गावात कारभारी होण्यासाठी तयारी चालविली हाेती; पण लाड आणि कदम ऐक्यामुळे महाआघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोर दिसून येत होता. दोन्ही गटांनी एकत्रित येऊन भाजपविरुद्ध लढून तालुक्यातील दह्यारी, भिलवडी आणि माळवाडी ग्रामपंचायतींत सत्तांतर घडविले. काही ठिकाणी स्थानिक गटातील गटबाजी ही दोन्ही पक्षांना डोकेदुखी ठरली. तरीही चुरशीने झालेल्या मतदानाचे फलित सत्तेच्या सारीपाठावर दिसून आले.
भिलवडीत खंडोबा विकास पॅनेलविरोधात भिलवडी परिवर्तन विकास पॅनेलची तुल्यबळ लढत होऊन काँग्रेसप्रणित खंडोबा विकास पॅनेलने १३ जागा जिंकून सत्तांतर घडविले. परिवर्तन पॅनेलला केवळ ४ जागांवर समाधान मानावे लागले. धनगावमध्ये काँग्रेसप्रणित जय हनुमान ग्रामविकास पॅनेलने ६ जागा जिंकून सत्तांतर केले. आम्ही धनगावकर ग्रामविकास पॅनेलला ३ जागांवर समाधान मानावे लागले. माळवाडीत जयहनुमान विकास पॅनेलने १३ जागा जिंकून सत्तांतर केले. जय हनुमान महायुती पॅनेलला १, तर अपक्षला १ जागा मिळाली. दह्यारीत काँग्रेसप्रणित जय हनुमान पॅनेलने ४ जागा जिंकून सत्तांतर केले. पहिले महाराष्ट्र केसरी दिनकर दह्यारीकर पॅनेलला ३ जागांवर समाधान मानावे लागले.