सांगली : जिल्ह्यात बुधवारी (दि. १५) महालसीकरणाची महत्वाकांक्षी मोहीम राबवली जाणार आहे. एका दिवसात तब्बल दीड लाख लोकांना कोरोनाची लस टोचण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १ लाख ७० हजार डोस प्राप्त झाले आहेत. मोहिमेत सहभागाचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
मोहिमेची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, लसीकरण अधिकारी डॉ. विवेक पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट टाळण्यासाठी मोहीम राबवली जाईल. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत १८ वर्षांवरील सर्वांना लस मिळेल. लसीकरण केंद्रांवर दिव्यांग व वृध्दांसाठी वाहतुकीची सोय केली आहे. केंद्रावरच ऑनलाईन नोंदणी करता येईल. सर्व केंद्रांवर पोलीस तसेच सेवा योजना व एनसीसीचे विद्यार्थी तैनात असतील.
डुडी म्हणाले की, महाअभियानासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज आहे. आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविकांची नियुक्ती केली आहे. मोठ्या गावांत शिक्षकांनाही मदतीला घेतले आहे. आवश्यकतेनुसार खासगी रुग्णालयाचे कर्मचारीही घेतले जातील. आयुक्त कापडणीस म्हणाले की, महापालिका क्षेत्रात आवश्यकतेनुसार केंद्रे वाढविण्यात येतील. भाजीपाला विक्रेते, फेरीवाले, बांधकाम कामगारांच्या लसीकरणाचीही सोय केली आहे.
चौकट
मोहिमेची तयारी अशी
- लसीकरणासाठी जिल्हाभरात ६०० केंद्रे
- महापालिका क्षेत्रात १९४ लसीकरण केंद्रे
- ग्रामिण भागात ३५० व शहरी भागात ५६ केंद्रे
- केंद्रांवर अतिरिक्त कर्मचारी नियुक्त
- लसीचे १ लाख ७० हजार डोस मिळाले
- महापालिका क्षेत्रात ५० हजार डोसचे उद्दिष्ट