गजानन साळुंखे- माधवनगर --माधवनगर, बुधगाव, कवलापूर, बिसूर, कांचनपूर, रसूलवाडी, सांबरवाडी या सात गावांसाठी युती शासनाने १६ कोटी रुपये खर्चून माधवनगर प्रादेशिक नळपाणी पुरवठा ही महत्त्वाकांक्षी योजना निर्माण केली. पण योजनेच्या निर्मितीपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. ही गावे पाणीपट्टी वेळेत भरत नसल्याने लाखो रुपयांची थकबाकी आहे. या योजनेसाठी प्रोत्साहनपर अनुदान योजनेतून वारंवार मदत केली आहे. तरीही गावच्या माथी असणारा थकबाकीचा कलंक पुसला जात नाही. माधवनगरही यापूर्वी या थकबाकीच्या यादीत आघाडीवर होते. पण गेल्या पाच वर्षात पाणीपट्टीची वसुली करणे व शासनाकडे वेळेत थकबाकी भरणे यावर ग्रामपंचायतीने विशेष लक्ष दिल्याने, माधवनगर थकबाकीदार गावांच्या यादीत नाही. एप्रिल ते आॅक्टोबर २०१४ अखेर आलेल्या पाणीपट्टीचे एकूण ८ लाख ११ हजार ६0९ रुपये असे संपूर्ण बिल ग्रामपंचायतीने भरले आहे. तरीही माधवनगरला पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.माधवनगर ग्रामपंचायतीने पाणीपट्टी भरली तरीही या योजनेतील इतर गावांची पाणीपट्टी थकबाकी मोठी आहे. या ग्रामपंचायतींची वसुलीच वेळेत होत नाही. त्यामुळे या गावांना पाणीपट्टी वेळेत भरणे शक्य होत नाही. सध्या ही थकबाकी १५ लाख आहे. महावितरण आपले वीज बिल सर्व एकरकमी घेणार, की काही सवलत ग्रामपंचायतींना मिळणार, यावरच पाणीपुरवठा पूर्ववत होणार आहे. महावितरणने यापूर्वी सातत्याने वीज बिल भरण्यासाठी ग्रामपंचायतींना सूचना दिल्या होत्या. नोटीसही दिली होती. आता प्रथम थकबाकी भरा, मग वीजपुरवठा सुरू करू, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे. आज (सोमवार) दिवसभर या सातही गावात थकबाकी भरण्यासाठी धावपळ सुरू होती, पण रक्कम मोठी असल्याने पदाधिकारी चिंतेत दिसत होते. त्यातच ग्रामस्थांचीही पाण्यासाठी विचारणा होत होती. पाण्यासाठी हाल होत असल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तरे देताना हैराण झालेले हे पदाधिकारी आता आक्रमक झाले असून, आंदोलनाची भाषा बोलू लागले आहेत.माधवनगर ग्रामपंचायत नेहमी शंभर टक्के पाणीपट्टी भरते. एवढेच नव्हे, तर चालू महिन्याचे बिलही आम्ही त्वरित भरत आहोत. वारंवार होणारी गळती काढण्यातही ग्रामपंचायत अग्रेसर आहे. पण तांत्रिक कारणाने इतर गावांमुळे आमचा पाणीपुरवठा बंद होत आहे. माधवनगरला स्वतंत्र पाणीपुरवठा करा, आम्ही वेळेत पाणीपट्टी भरू, ही ग्रामस्थांची जुनी मागणी आहे. इतर गावांची थकबाकी वेळेत येत नाही म्हणून आमचा पाणीपुरवठा बंद पडतो.- सौ. नंदाताई कदम, सरपंच, माधवनगर
बिल भरूनही माधवनगर तहानलेलेच
By admin | Updated: November 17, 2014 23:20 IST