सांगली : गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील पक्षीय व शासकीय कार्यक्रमांना लागणारी हजेरी व राजकारणातील सक्रियता यामुळे जितेश कदम यांच्या राजकीय प्रवासाची चर्चा सध्या सांगलीच्या राजकीय पटलावर सुरू झाली आहे.
मदनभाऊ गटाची महापालिका क्षेत्रात मोठी ताकद आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर या गटाचे पालकत्व जयश्री पाटील यांच्याकडे आले, मात्र सक्रिय राजकारणाबाबत व निवडणूक लढविण्याबाबत त्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. या गटाने आता त्यासाठी मदन पाटील यांचे जावई जितेश कदम यांना ताकद देण्यास सुरुवात केली आहे. जितेश कदम हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांचे नातू आहेत. त्यामुळे कदम व मदनभाऊ गट सध्या एकसंध आहेत. दोन्हींकडून त्यांना बळ मिळत आहे.
सुरुवातीला सांगली विधानसभा मतदारसंघासाठी त्यांची चर्चा केली जात होती. मात्र, गेल्या काही महिन्यांतील त्यांची जिल्ह्याच्या अन्य भागातील कार्यक्रमांना लागणारी उपस्थिती लोकसभेच्या निवडणूक तयारीचे संकेत देणारी ठरत आहे. तासगावमधील काँग्रेसचा पक्षप्रवेश कार्यक्रम त्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. त्याचबरोबर कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भाग, जत याठिकाणच्या कार्यक्रमांनाही त्यांनी हजेरी लावल्याने सर्वांना आश्चर्य वाटले. जिल्हाधिकारी कार्यालयातील एका आढावा बैठकीतही कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्यासोबत त्यांनी हजेरी लावली. एकूणच त्यांचा हा प्रवास खासदारकीची निवडणूक लढविण्यासाठी सुरू असल्याचे दिसत आहे.
अनेक वर्षांपासून सांगली लोकसभा मतदारसंघावर दादा घराण्याचे वर्चस्व होते. भाजपने ते मोडीत काढले. त्यानंतर गत निवडणुकीत काँग्रेसतर्फे कोणीही लोकसभा निवडणूक लढविण्यास तयार नव्हते. अखेरच्या क्षणी काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढविली होती. त्यामुळे यापुढे त्यांची भूमिका काय असणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच जितेश कदम यांची सक्रियता त्यामुळे अधिक चर्चेत आली आहे.
चौकट
उमेदवारीसाठी संघर्ष शक्य
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगली जिल्ह्याचा आगामी खासदार काँग्रेसचा असल्याचे सांगतानाच मोठ्या घराण्यांच्या योगदानाचे कौतुक करून त्यांच्या वारसांना तिकीट देण्यात वावगे नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे खासदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी काँग्रेसमध्ये यंदा वसंतदादा गट व मदनभाऊ गट आमने-सामने येण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.