सांगली : शिवप्रतिष्ठानच्यावतीने आज, रविवारी (दि. १ मे) हिंदवी स्वराज्य मानवंदना सोहळा कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे सांगलीत येत आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी क्रीडांगणावर सायंकाळी पाच वाजता सभेचे आयोजन केले आहे. या सभेत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाची घोषणा होईल का, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मोठ्या कालावधीनंतर ठाकरे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने शिवसैनिकांसह सर्वसामान्यांत उत्सुकता आहे. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर तालुक्यांत यावर्षी भीषण दुष्काळ पडला आहे. सलग दोन वर्षे खरीप हंगाम वाया गेला आहे. सिंचन योजनांना पुरेशा निधीची तरतूद होत नाही. या सर्व संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. या प्रश्नांवर उद्धव ठाकरे काय बोलणार? शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा ते करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्यांनी शनिवारी सभास्थळाची पाहणी केली. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आ. नीलम गोऱ्हे, संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, संजय विभूते आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या सभेकडे लक्ष
By admin | Updated: May 1, 2016 00:28 IST